महम्मद अली रोड आणि त्याच्या आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये शुकशुकाट

मुंबई : रमजानच्या महिन्यात खाद्यपदार्थाची असंख्य दुकाने, फेरीवाले, मांसाहारी पदार्थाची रेलचेल असणाऱ्या महम्मद अली रोड आणि त्याच्या आजूबाजूच्या गल्ल्यांमधील चहलपहल या वेळी टाळेबंदीमुळे पूर्णत: थंडावली आहे. तर मश्ीाद बंद असल्यामुळे घरातच नमाज पढला जात आहे.

एरवी रमजानच्या महिन्यात मुंबईच्या मुस्लीमबहुल भागात मोठी गर्दी उसळते. विशेषत: सायंकाळी रोजा सोडण्याच्या वेळेनंतर रात्रभर महम्मद अली रोड, नागपाडा, डोंगरी, भेंडी बाजार, भायखळा हे परिसर खाद्यपदार्थाची हॉटेल्स, फेरीवाले यांनी गजबजलेले असतात. विशेषत: मिनारा मशीदच्या बाजूची गल्ली ही खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे, मात्र टाळेबंदीमुळे सध्या हा परिसर एकदम शांत आहे.

रमजानच्या महिन्याची सुरुवात शनिवारपासून झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या भागात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी राहीली. मात्र जे. जे. आणि डोंगरी परिसरात काही प्रमाणात वर्दळ सुरूच असल्याचे दिसून आले.

केवळ सकाळी आठ ते १२ याच काळात दुकाने सुरू असल्यामुळे या वेळेत गरजेचे सामान घेण्याची सुविधा या भागात आहे. दिवसभर उपवास, हाताला काम नाही आणि अत्यंत दाटीवाटीची वस्ती यामुळे आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये संध्याकाळी पाचनंतर बरीच गर्दी दिसते. त्यातच आडबाजूला फळविक्री वगैरे सुरू होते. मात्र साधारण साडेसहानंतर पोलिसांनी बंदोबस्तात वाढ झाल्यावर सर्व रस्ते एकदम सुनसान झाले.

मशीद परिसर हे रमजानच्या काळातील सर्वाधिक गजबजणारे ठिकाण, पण येथील सर्व गल्ल्यांच्या सुरुवातीलाच दुभाजक लावल्यामुळे नागरिकांच्या वर्दळीला अटकाव झाला आहे. या परिसरातील सर्वच मशिदीचे दरवाजे बंद केले असल्याने मशिदीच्या परिसरात भटकणाऱ्यांची संख्या मात्र मोठय़ा प्रमाणात दिसून येते. मशीद बंद असून घरीच नमाज पढण्याबाबतच्या सूचना दरवाज्यावर लावल्या आहेत, तर अनेक समुदायांनी संस्थांच्या वेबसाइटवर घरीच राहून काय करावे याबाबत सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

एक-दोन ठिकाणी अंतर्गत भागात संध्याकाळच्या आधीच बिर्याणी वगैरेची पार्सल सुविधा सुरू असताना दिसली. दुसरीकडे माहीम परिसरात पूर्णपणे शांतता होती. मात्र कुर्ला परिसरात मशिदीच्या भोवताली गर्दी, काही ठिकाणी फिरणी वगैरे पदार्थाची विक्री आणि अनेक हॉटेलमधून पार्सल सुविधा सुरू होती.

पालिके तर्फे  फळे, खजूर, लस्सीचे वाटप

मुंबई : मुस्लीम समाजाचा रमझान सण शनिवारपासून सुरू झाला असून रोजा सोडण्यासाठी मुस्लीम बांधवांना दररोज संध्याकाळी एक लस्सी, एक फळ आणि दोन खजूर देण्यात येत आहे.रमझान महिन्यामध्ये मुस्लीम समाजातील अनेक श्रद्धाळू दिवसभार रोजा म्हणजेच उपवास करता आणि संध्याकाळी उपवास सोडतात. सूर्योदयापूर्वी पुन्हा त्यांचा उपवास सुरू होतो. करोनाच्या पार्श्वभूमीवर उपवास सोडण्यासाठी आवश्यक ते पदार्थ त्यांना घरपोच करण्याचा निर्णय पालिकेने केला आहे. त्यानुसार दररोज सायंकाळी ५ वाजता एक लस्सी, एक फळ आणि दोन खजूर यासोबत त्यांना रात्रीचे जेवण उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. मुस्लीम बांधवांना खाद्यपदार्थाची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडावे लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.