कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने अर्थात कोंबडीचे मांस व अंडी यांचा करोना विषाणू प्रादुर्भावाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे शिजवलेले कोंबडीचे मांस किंवा अंडी यापासून करोनाचा धोका नसल्यामुळे आहारामध्ये ते वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोंबडी व अंडी खाण्याबाबत समाजमाध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या. समाजमाध्यमांवर कुक्कुट उत्पादनांबाबत फिरत असलेल्या अफवांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे व याबाबत काही शंका असल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करावा, असेही आवाहन या विभागाने केले आहे.

महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालन व्यवसायामध्ये देशात अग्रेसर आहे. सन २०१९ च्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये एकूण कुक्कुट संख्या सुमारे ७ कोटी ४२ लाख इतकी आहे. राज्यातील कुक्कुटपालन व्यावसायावर लाखो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मका व सोयाबीन उत्पादक शेतकरी विशेषत: कुक्कुटपालन उद्योगाशी संलग्न आहेत.

तसेच कुक्कुट व्यवसाय राज्याच्या विकासाशी जोडलेला आहे. कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने यांच्या सेवनामुळे मानवामध्ये ‘नोव्हेल करोना विषाणू’ संक्रमित झाल्याचे संदर्भ नाहीत. आपल्याकडे चिकन व मटन उकळून शिजवून सेवन केले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत.

कुक्कुट पक्ष्यामधील करोना विषाणू (इन्फेक्शिअस ब्रॉंकायटीस) मानवामध्ये संक्रमित होत नसल्याबाबत शास्त्रीय संदर्भ आहेत. तरी ग्राहकांनी समाजमाध्यमांद्वारे (सोशल मीडिया) प्रसारित करण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, अशीही माहिती महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे देण्यात आली आहे.