मुंबई : राज्यात प्राणवायू पुरवठ्या अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. नाशिक, मुलुंड किंवा अन्य एक-दोन ठिकाणी प्राणवायू टाक्यांची गळती होऊन अपघात झाल्याने रुग्ण दगावले, पण प्राणवायू पुरवठ्याअभावी रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘ लोकसत्ता ‘ शी बोलताना केले.

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत बोलताना देशातही प्राणवायू अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केला होता आणि त्यावरून विरोधकांनी गदारोळ केला होता. आता राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनीही हाच दावा केला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पण आम्ही उद्योगांचा १०० टक्के प्राणवायू वैद्यकीय क्षेत्राकडे वळवून पुरवठा सुरळीत ठेवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियोजन करून रुग्णालयांच्या प्राणवायू पुरवठ्यावर लक्ष ठेवले. काही रुग्णालयांमधील प्राणवायू संपत आला किंवा अपघात झाले, तेव्हा अन्य रुग्णालयांमध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे प्राणवायू पुरवठ्याअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. उच्च न्यायालयातही आम्ही हेच शपथपत्र दाखल केले असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा रुग्णसंख्या कमाल पातळीवर होती, तेव्हा साधारणपणे १७०० मेट्रिक टन इतका प्राणवायूची दररोज गरज भासत होती. आता तिसऱ्या लाटेतील गरज लक्षात घेऊन तीन ते साडेतीन हजार मेट्रिक टन इतका प्राणवायू दररोज उपलब्ध होईल, असे नियोजन करण्यात आले आहे. रुग्णालयांमध्ये निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत, काही कंपन्यांकडून पुरवठा वाढविणेयात आला आहे. त्यामुळे प्राणवायू उपलब्धतेची अडचण होणार नाही, असे टोपे यांनी सांगितले.