02 March 2021

News Flash

टॅक्सी- रिक्षा भाडेवाढ तूर्त टळली!

दरवर्षी मे महिन्यात रिक्षा- टॅक्सींची भाडेवाढ करावी, या हकीम समितीने केलेल्या शिफारशीनुसार टॅक्सी-रिक्षा युनियन्सतर्फे भाडेवाढ मागितली जात असली तरी याबाबत तूर्तास काहीच निर्णय घेण्यात आलेला

| May 1, 2013 05:15 am

दरवर्षी मे महिन्यात रिक्षा- टॅक्सींची भाडेवाढ करावी, या हकीम समितीने केलेल्या शिफारशीनुसार टॅक्सी-रिक्षा युनियन्सतर्फे भाडेवाढ मागितली जात असली तरी याबाबत तूर्तास काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. परिणामी पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच १२ जूनपर्यंत टॅक्सी-रिक्षा भाडेवाढ टळली आहे.
१ मेपासून होणाऱ्या रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीला मुंबई ग्राहक पंचायतीने विरोध दर्शवत भाडेवाढीबाबत याआधीच दाखल असलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची विनंती सोमवारी केली होती. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अमजद यांच्या खंडपीठासमोर त्यानुसार मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळेस महाधिवक्ता दरायस खंबाटा यांनी हकीम समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र दिनापासून केल्या जाणाऱ्या टॅक्सी-रिक्षा भाडेवाढीबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती दिली. न्यायालय या याचिकेवर सुनावणी घेत नाही तोपर्यंत हा निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्वासनही खंबाटा यांनी दिले.
ग्राहक पंचायतीच्या वतीने अ‍ॅड्. उदय वारूंजीकर यांनी युक्तिवाद करताना ऑक्टोबर महिन्यातच भाडेवाढ करण्यात आलेली असल्याने लगेचच नवी भाडेवाढ केली तर तो प्रवाशांवर अन्याय होईल, असे निदर्शनास आणून दिले. भाडेवाढ करताना सरकार लोकांचा विचार करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या युक्तिवादाची गंभीर दखल घेत न्यायालयानेही टॅक्सी-रिक्षा भाडेवाढ करताना सरकारने लोकांचे म्हणणेही ऐकावे आणि नंतर निर्णय घ्यावा तसेच टॅक्सी-रिक्षा चालकांनाही महागाईचा फटका बसत असून त्यांचीही बाजू सरकारने ऐकावी, असे स्पष्ट करीत प्रकरणाची सुनावणी १२ जूनपर्यंत तहकूब केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 5:15 am

Web Title: no decision on taxi and auto fare hike till june 12 maha govt
टॅग : Fare Hike
Next Stories
1 चव्हाणांच्या धमकीचा भाजपकडून ‘समाचार’!
2 ‘कॅम्पाकोला’ कारवाईचा खर्च बिल्डरकडून वसूल करणार
3 राष्ट्रवादीच्या ताब्यातील मतदारसंघांवर काँग्रेसचा डोळा
Just Now!
X