मुंबई : शिवसेनेबरोबर राज्यात सरकार स्थापनेची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले. ‘ सत्तास्थापनेची आम्हाला कोणतीही घाई नाही, सरकार कोसळल्यावर पाहू, ‘ असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे.

फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी भेट झाली होती. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी नवीन राजकीय समीकरणे जुळविली जाणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजप व शिवसेनेकडून राजकीय मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे खंडन करण्यात आले आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘ सामना ‘ साठी फडणवीस यांची मुलाखत बिहार निवडणुकीनंतर होणार असून त्याचे प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगितले जात असले तरी शिवसेना-भाजपमधील गेले वर्षभर ताणले गेलेले व तुटलेले संबंध पुन्हा जुळविण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे.

यासंदर्भात फडणवीस म्हणाले, ही भेट मुलाखतीसंदर्भातच होती आणि शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. हे सरकार पाडण्याची आम्हाला कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या कृतीतूनच पडेल,असा मला विश्वास आहे. सरकार पडल्यावर काय करायचे ते पाहू. भाजप विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी  – संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील आणि सरकारची ही व्यवस्था कायम राहील, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘ लोकसत्ता’शी बोलताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही आमचे नेते आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.  भाजपबरोबर वैचारिक मतभेद झाले, पण वैयक्तिक संबंध असतात. आम्ही एकमेकांचे शत्रू होत नाही. भाजपबरोबर सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर माझ्या भेटी व्हायच्या याकडेही त्यांनी लक्ष वेधले.