बारावीच्या परीक्षांवर सर्वतोपरी बहिष्कार टाकण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र शिक्षणसंस्था महामंडळा’ने घेतला असला तरी मुंबई-ठाण्यातील तब्बल दीड हजार शाळांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या ‘महामुंबई शिक्षणसंस्था संघटने’ने या बहिष्कारापासून लांब राहण्याची भूमिका घेतल्याने निदान मुंबई-ठाण्यातील विद्यार्थ्यांना तरी या बहिष्कार आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता नाही.
‘महामुंबई शिक्षणसंस्था संघटना’ ही शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात एकत्र आलेल्या शिक्षक, पालक आणि संस्थाचालकांच्या ‘शिक्षण हक्क कृती समिती’ची सदस्य आहे. समितीच्या मागण्यांवर संबंधितांनी एकत्र यावे यासाठी समितीचे अध्यक्ष प. म. राऊत, निमंत्रक अमोल ढमढेरे यांनी राज्यभर तब्बल १६ सभा घेतल्या. राऊत हे ‘महामुंबई शिक्षणसंस्था संघटने’चेही अध्यक्ष आहेत. या संघटनेच्या मुंबई-ठाण्यातील तब्बल दीड हजार शाळा सदस्य आहेत. त्यामुळे, ही संघटना मुंबई-ठाण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
समितीच्या सभांच्या निमित्ताने राऊत यांना पालकांचा कल जाणून घेता आला. समितीच्या आंदोलनांमध्ये पालकांनाही सहभागी करून घ्यायचे असेल तर त्यांना दुखवून चालणार नाही. त्यामुळे, महामंडळाच्या आदोलनापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे प. म. राऊत यांनी सांगितले.
समितीमध्ये पालकांच्या संघटनाही मोठय़ा प्रमाणात सहभागी आहेत. पालकांचा कृती समितीच्या मागण्यांना पाठिंबा आहे. तसेच, समितीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होण्याची तयारीही आहे.
मात्र, बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांची अडवणूक करणे आपल्याला मान्य नाही. तसे झाल्यास समिती आंदोलनांपासून आम्ही दूर राहू, अशी पालकांची भूमिका आहे. परिणामी राऊत यांच्या संघटनेनेही या आंदोलनापासून लांब राहण्याचे ठरविले आहे.