महावितरणच्या शहापूर उपकेंद्रातील महापारेषण कंपनीच्या रोहित्राची क्षमता दुपटीने वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी रात्री १०पासून शनिवारी दुपारी १२ पर्यंत म्हणजे तब्बल ३८ तास या भागातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणला जास्त क्षमतेचा वीजपुरवठा करण्याबरोबरच जास्तीचे वीजजोडणी देणे शक्य होणार आहे, असे महावितरणच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या कामामुळे आसनगाव, धसई, आटगाव, डोळखांब, किन्हवली, भातसा, वैतरणा, मोडकसागर, कसारा, आटगांव, पडघा, शहापूर या भागांतील वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठय़ासह अत्यावश्यक सेवेवर परिणाम होणार आहे. हा पुरवठा ठरावीक वेळेत आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी काही काळ विद्युतपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. मात्र आणीबाणीच्या परिस्थितीत पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाच्या वतीने देण्यात आली.
मुंब्रा, दिव्यातही अंधार
मुंब्रा व दिवा येथे वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रात देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने बुधवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ या वेळात वीजपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे सागर हॉटेल परिसर, रशीद कंपाऊंड, देवरीपाडा, बरकत पार्क, अजीज कंपाऊंड, वफा पार्क, सैनिक नगर, अलमास कॉलनी या भागांतील वीजपुरवठा बंद राहणार आहेत.