News Flash

मुंबईतील ड्रग माफियांना दुबईत “नो एंट्री”

दुबई सोडून मुंबईच्या ड्रग माफियांची युरोपकडे धाव

– राजू परुळेकर

मुंबईच्या काळ्या साम्राज्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी मुंबईत रक्तरंजित इतिहासाचे टोळीयुद्ध घडले. दुबईत बसून आपल्या हस्तकाकरवी मुंबईत, ठाणे, नवी मुंबईसह देशातील महत्वाच्या शहरात अमली पदार्थ पुरवून अमाप पैसे कमविण्याचा ध्यास या माफियांना होता. मात्र तपास यंत्रणेच्या ससेमिरा वाचविण्यासाठी सुरक्षित समजली जाणारी दुबई आता याच ड्रग्स माफियांसाठी असुरक्षित झाली आहे. देशभरात अमलीपदार्थ पुरवठा करण्याचे रॅकेट चालविणाऱ्या माफिया किंगच्या मुसक्या दुबई पोलिसांनी आवळल्या असून ड्रग्स माफियांशी संबंध किंवा व्यापार उघडकीस आला कि त्याला दुबईत नो एंट्री करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. दुबई सरकारच्या या कारवाईने अनेक वर्षे दुबईत बसून व्यवसाय चालविणाऱ्या ड्रग्स माफियांना आता दुबईत “नो एंट्री” करण्यात आल्याने दुबईतील माफिया यांनी युरोपीय देशांकडे कूच केल्याची सूत्रांची माहिती आहे.

अमली पदार्थाच्या तस्करीतील ड्रग्स माफिया हा मुळचा भारतीय आणि केनियात स्थायिक असलेला विक्की गोस्वामी हा सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील ड्रग्स माफियांचा किंग आहे. ठाणे पोलिसांच्या रेकॉर्डवरही गोस्वामी आहे. सोलापूर येथे सापडलेले अडीच हजार कोटीच्या एफेड्रीन प्रकरणी ठाणे पोलिसांना विकी गोस्वामी हवा आहे. त्याच्या नावावर गुन्हा नोंद आहे. विकी गोस्वामीला अमली पदार्थाच्या प्रकरणात दुबईत अटक करण्यात आल्यानंतर त्याला कारागृहात बंदिस्त करण्यात आले आहे. सध्या तो कारागृहात असून त्याची दुबई मधील शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची रवानगी केनयात करण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र विकी गोस्वामीला संपूर्ण हयातीत दुबईत एंट्री मिळणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबईतील कुलाबा या उच्चभ्रू वस्तीतील ड्रग्स माफिया कुंदन खान याचा मुलगा नावेद हा ही दुबईत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात नावेद हा ड्रग्स डीलर असल्याची माहिती दुबई पोलिसांना मिळाली. दुबईत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. पण ड्रग्स डीलर असल्याचे समजल्यावर त्यालाही दुबईबाहेर काढण्यात आले. तसेच नावेद खानच्या दुबईत येण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. सेल्समन ते कोट्यधीश झालेला ड्रॅग डीलर अब्दुल अझीझ उन्नी मोहंमद उर्फ अझीझ रोलॅक्स उर्फ अझीझ टकला हा सध्या दुबईत वास्तव्यास आहे. दुबईतील आणि जगातील प्रसिद्ध घड्याळाची कंपनी रोलॅक्समध्ये सेल्समनचे काम अझीझ टकला करीत होता. दुबईत अझीझ टकला अनेक वर्षांपासून राहात आहे. अन अजूनही तो दुबईतच राहतो आहे. मात्र दुबई पोलिसांनी ड्रग्सशी संबंधित गुंडांवर कारवाई करण्याची मोहीम उघडल्याने आता अझीझ टकलावरही संक्रात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुंबईत रक्तरंजित टोळीयुद्ध हे काळ्या साम्राज्यातून मिळणाऱ्या अमाप पैशांमुळेच आज अमली पदार्थाची तस्करी हा झटपट पैसे कमविण्याचा धंदा सध्या आहे. त्यामुळेच मुंबईत, ठाणे आणि महत्वाची प्रगत शहरातून अमली पदार्थ ग्राहकांना पुरविणारे अनेक आणि शेकडो सबडीलर आज तयार झाल्याचे चित्र अमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात येणाऱ्या आरोपींच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. परंतु आता भारताने अनेक देशांशी गुन्हेगारांच्या संदर्भात कडक करार केले असल्याने आता, विदेशात राहून भारतात कारवाया करणाऱ्या मूळच्या भारतीय गुन्हेगारांची गोची झाली आहे. अनेक भारतीय गुन्हेगारांसाठी दुबई वास्तव्याचं हक्काचं ठिकाण होतं. मात्र, दुबई पोलिसांनी त्यांच्यावरचा वरदहस्त काढून घेतल्याने मुंबईतील नामांकित गुंड आणि अमली पदार्थांच्या तस्करांना दुबई परकी होत चालल्याचे अंडरवर्ल्डमधल्या सूत्रांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 12:49 pm

Web Title: no entry for mumbais drug mafias in dubai
Next Stories
1 गरबा खेळताना आपल्याच पत्नीकडे एकटक पाहणाऱ्या पतीला मारहाण
2 अबब ! देवीच्या मंडपासाठी वापरली तब्बल ४ हजार किलो हळद
3 Kerala Nun Rape Case: फ्रँको मुलक्कलला सशर्त जामीन
Just Now!
X