एसटीच्या ‘शिवनेरी’ श्रेणीच्या प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाची हमी देणाऱ्या आणि नव्या प्रवाशांना आकृष्ट करण्याची क्षमता असलेल्या स्कॅनिया कंपनीच्या नव्या गाडय़ा एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याआधीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ महामंडळावर आली आहे. या गाडीचे वजन वाहतूक विभागाच्या नियमांपेक्षा दीड टनांनी जास्त असल्याने या गाडय़ांबाबतचे कार्यादेश महामंडळाने रद्द केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नव्या स्कॅनिया गाडय़ांचे वजन नियमाने आखून दिलेल्या वजनापेक्षा दीड टनांनी जास्त असल्याने महामंडळाला त्या नोंदवण्यासाठी जादा भरुदड पडणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. महामंडळाने स्कॅनिया कंपनीच्या ३७ नव्या गाडय़ा विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यापैकी ३३ गाडय़ांचे वजन १२ ऐवजी साडेतेरा टन एवढे असल्याचे आढळले होते. त्यानंतर शुक्रवारी स्कॅनिया कंपनीच्या अधिकाऱ्यांसह महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत हे कार्यादेश रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या गाडय़ांचे वजन जास्त असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी मिळणे अशक्य आहे. तसेच वजनाचा परिणाम वेगावरही होऊ शकत असल्याने महामंडळाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी हा कार्यादेश रद्द करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी आपल्याला अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले.