News Flash

आरोपपत्रात गोस्वामी, अन्य कर्मचाऱ्यांविरोधात पुरावाच नाही

वाहिनीचा मालकीहक्क असलेल्या कंपनीचा दावा

आरोपपत्रात गोस्वामी, अन्य कर्मचाऱ्यांविरोधात पुरावाच नाही
(संग्रहित छायाचित्र)

टीआरपी घोटाळा

टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या हजारो पानांच्या आरोपपत्रात रिपब्लिक वाहिनी वा वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात एकही पुरावा नसल्याचा दावा वाहिनीची मालकी असलेल्या ‘एआरजी कंपनी’ने मंगळवारी उच्च न्यायालयात केला. गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यामध्ये ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून झालेला निवडक संवादही पूर्वग्रह निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उघड केल्याचा आरोपही कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

टीआरपी घोटाळाप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या तसेच पोलिसांच्या कारवाईपासून दिलासा देण्याच्या मागणीसाठी गोस्वामी आणि कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या महिन्यात या याचिकेवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वत: मुख्यत्वे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्याला प्रत्युत्तरादाखल कंपनीतर्फे मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण, तसेच पालघर येथील झुंडबळी प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत ‘रिपब्लिक’ वाहिनीने कोणतीही भीड न बाळगता केलेल्या वार्ताकनाचा सूड उगवण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लक्ष केले जात आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधातील कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपसुद्धा कंपनीने केला आहे.

टीआरपी घोटाळ्यात मूळ तक्रारदार असलेल्या ‘हंसा रिसर्च ग्रुप’नेही तक्रारीत कुठेही रिपल्बिक वाहिनीच्या वा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नावे नमूद केलेली नाहीत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेलाही ‘रिपब्लिक’ वाहिनी आणि कंपनीच्या एकाही कर्मचाऱ्याविरोधात पुरावा सापडलेला नाही. असे असतानाही पोलिसांनी वाहिनी आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांना आरोपपत्रात फरारी आरोपी म्हणून दाखवले आहे, असा कंपनीचा दावा आहे.

पोलिसांनी कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांची शारीरिक छळवणूक केली असून त्यात कंपनीचे साहाय्यक उपाध्यक्ष घन:श्याम सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांचा समावेश आहे. तर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना या प्रकरणी गोवण्यात येईल असे धमकावले जात आहे, असा आरोपही कंपनीने केला आहे. त्याच वेळी टीआरपी घोटाळ्यामुळे प्रभावित झालेले जाहिरातदार वा माध्यम समूहांनी पुढे येऊन तक्रार केली नसल्याकडेही कंपनीने प्रतिज्ञापत्रात लक्ष वेधले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:29 am

Web Title: no evidence against goswami or other employees in the chargesheet abn 97
Next Stories
1 केरळमधून येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी अहवाल सक्तीचा
2 फोडणीत पडण्याआधीच कढीपत्त्याची तडतड!
3 फोडणीतील कढीपत्ता तडतडला
Just Now!
X