मुंबई: स्वयंघोषित अध्यात्म गुरू राधे माँ हिने जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा कुठलाही पुरावा पुढे आलेला नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी सोमवारी उच्च न्यायालयात दिली.

अ‍ॅड्. फाल्गुनी ब्रह्मभट यांनी राधे माँविरोधात तक्रार करून  सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन तसेच लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.  ट्रस्टमध्येही मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार केले जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी जोशी-फणसाळकर यांच्या खंडपीठासमोर सोमवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी पोलिसांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात राधे माँविरोधात तक्रार करणाऱ्या तक्रारदारांचे, साक्षीदारांचे जवाब नोंदवण्यात आल्यावर तसेच तिच्या घरी घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा कुठलाही पुरावा पुढे आलेला नाही, असा दावा पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. याचिकाकर्त्यांसोबत राधे माँचाही जवाब नोंदविण्यात आला असून आपल्याला या प्रकरणी गोवण्यात येत असल्याचा दावा राधे माँने केला आहे. राधे माँच्या घरावर छापे टाकून झडती घेण्यात आली. मात्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा कुठलाही पुरावा सापडलेला नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

राधे माँकडून चालविल्या जाणाऱ्या ट्रस्टमध्ये पैशांचा गैरव्यवहाराचा तपास करण्यासाठी  धर्मादाय आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले असून प्राप्तिकर विभागालाही चौकशी करण्याबाबत विनंती करण्यात आल्याचे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.