माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची चौकशी सुरू असून आतापर्यंतच्या चौकशीत गावित यांच्यावर गुन्हा दाखल करण्याजोगे पुरावे हाती लागलेले नाहीत. चौकशी पूर्ण झाल्यावर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली.
गावित यांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी खुली चौकशी सुरू करण्यात आली असली तरी गावित आणि त्यांच्या कुटुंबियांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात का आलेला नाही, अशी विचारणा करीत न्यायालयाने राज्य सरकारला त्याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश मागील सुनावणीच्या वेळेस दिले होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस राज्य सरकारने चौकशी सुरू असल्याचे सांगत सकृतदर्शनी तरी गावित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याजोगे पुरावे हाती लागलेले नाहीत, अशी माहिती न्यायालयाला दिली. याशिवाय चौकशी कशा पद्धतीने करण्यात येत आहे याची माहितीही प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आली. न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) करण्यात येत असलेल्या चौकशीबाबत समाधान व्यक्त करीत ती योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विष्णू मुसळे यांनी या प्रकरणी केलेली याचिका दाखल करण्याजोगी नाही. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया न करताच ती करण्यात आलेली असल्याचा दावा करीत गावित यांनी याचिकेला विरोध केला. मात्र न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला.