मुंबईतील धर्मादाय रूग्णालयांमध्ये १० टक्के जागा दारिद्र्यरेषेखालील रूग्णांसाठी देवून त्यांच्यावर मोफत उपचार केले जात नसल्याचा औचित्याचा मुद्दा संजय दत्त यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. याबाबत शासन लवकरात लवकर कार्यवाही करेल, असे आश्वासन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले, तर उपसभापती वसंत डावखरे यांनीही यासंदर्भात बैठक बोलाविण्यात येईल, असे सांगितले.
या धर्मादाय संस्थांना शासनाने नाममात्र दराने लीजवर जागा उपलब्ध करून दिली आहे. सवलतीच्या दरात वीज, पाणीपुरवठा केला जातो आणि जकात सवलतीही दिल्या जातात. दारिद्रयरेषेखालील रूग्णांना विनामूल्य तर गरीब रूग्णांना १० टक्के बेड उपलब्ध करून देवून सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. तरीही ४० रुग्णालयांनी त्याचे पालन न केल्याचे शासनाने केलेल्या पाहणीतही आढळून आले आहे. त्यांना नोटीसा दिल्या तरी पुढे काहीच झाले नसल्याचे संजय दत्त यांनी निदर्शनास आणून दिले.