नेरूळ येथील अनधिकृत धार्मिक स्थळांवर सिडकोने केलेल्या कारवाईनंतर शनिवारी शहरामध्ये तणावाचे वातावरण होते. या घटनेनंतर नवी मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याचे आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी जारी केले आहेत. पुढील सात दिवसांपर्यंत हे आदेश शहरात लागू राहणार आहेत. धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोच्या अतिक्रमण विभागाने नेरूळ सेक्टर २८ आणि सेक्टर ३४ येथील सिडकोच्या जागेवर असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर मोठय़ा प्रमाणात त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
 अखेर पोलिसांनी समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र या घटनेनंतर राजकीय संघटनांकडून आणि नेत्यांकडून सिडकोवर आंदोलनाचा घाट घालण्यात आला आहे.
या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यास शहरात कायदा व्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून कलम १४४ नुसार प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहे. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी हे आदेश काढले आहेत.
या आदेशात सिडकोच्या अतिक्रमण कारवाईविरोधात किंवा त्याच्या अनुषंगाने जमाव जमवून विरोध, समर्थन, मोर्चा काढण्यास किंवा एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आले आहे. धार्मिक भावना दुखावतील असे पोस्टर्स, बॅनर्स, पत्रके छापण्यास, साठा करण्यास किंवा वितरण, प्रदर्शित करण्यात बंदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भित्तिचित्रे, रेखाचित्रे किंवा फलक लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सोशल मीडिया किंवा अन्य कोणत्याही प्रकारे संदेश पसरवून धार्मिक भावना दुखावतील असे कोणतेही आक्षेपार्ह कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.  त्याचप्रमाणे जमाव जमवून भावना भडकविणाऱ्यांवर कारवाई कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेश ७ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.