फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करणारे गायब; पालिका, पोलीस अधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांचा मलिदा

मुंबईत कुठेही अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून स्थानिक राजकारणी, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या हप्त्यांची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, हे हप्ते गोळा करण्यासाठी ‘झिरो नंबर’ नावाची एक स्वतंत्र यंत्रणाच कार्यान्वित असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सुरू झालेल्या कारवाईमुळे स्थानक परिसरातून फेरीवाले गायब झाले आहेतच; पण त्याबरोबरच हे ‘झिरो नंबर’ही हद्दपार झाले आहेत.

कोणाच्या नजरेत न येता बसल्या जागी लाखो रुपये खिशात घालण्यासाठी पालिकेतील काही अधिकाऱ्यांनीच ही झिरो नंबरची यंत्रणा जन्माला घातली. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आणि फेरीवाल्यांना दहशतीत ठेवून रोजच्या रोज हप्ता उकळण्याची कुवत असलेले सराईत गुन्हेगार गुंड ‘झिरो नंबर’ म्हणून धुमाकूळ घालत आहेत. यातले काही कारवाईसाठी बाहेर पडलेल्या पालिका वाहनांवर, पालिका अधिकाऱ्यांसोबत हक्काने फिरताना दिसतात.

दादरसह मध्य मुंबईत जमाल, बंगाली, राजू हे पालिकेचे ‘झिरो नंबर’. जमालच्या पाचशे हातगाडय़ा आहेत. त्या तो फेरीवाल्यांना भाडय़ाने देतो. दादर रेल्वे स्थानकाजवळील प्रत्येक फेरीवाल्याकडून दिवसाचा हप्ता गोळा करून त्यातून पालिका, पोलिसांना पोच करतो. कारवाई केली हे दाखवण्यासाठी पैसे घेतल्यानंतरही पालिका फेरीवाल्यांना हुसकावून लावते, त्यांच्या चीजवस्तू जप्त करते. तेव्हा जमालची टोळी फेरीवाल्यांना पालिकेची गाडी येत असल्याची आगाऊ सूचना देते. तसेच जप्त केलेला माल, हातगाडी सोडवण्यासाठी मदत करते.

दादरच्या न. चिं. केळकर मार्गावर तीन दशकांपासून विविध वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर सहा ‘लाइन्स’ आहेत. जसे सावंत वस्तू भंडार ते छपरा बिल्डिंग, सावंत वस्तू भंडार ते गणेश पेठ, गिरगाव पंचे डेपासमोर अशा सहा पदपथांवर फेरीवाले बसतात. प्रत्येक ठिकाणचे दर वेगळे. ‘‘आमच्या ‘लाइन’मध्ये साधारण ६० फेरीवाले धंदा करतात. त्या प्रत्येकाकडून राजू नावाचा पालिकेचा झिरो नंबर पैसे गोळा करतो. रविवारी शंभर, शनिवारी पन्नास, इतर दिवशी तीस रुपये हा आमच्या लाइनचा दर आहे. आता दिवाळीपूर्वी साधारण १५ दिवस राजूला प्रतिदिन शंभर रुपये या हिशोबाने आम्ही सर्व फेरीवाल्यांनी हप्ता दिला. राजू महिन्याचे पैसे गोळा करून त्यातून पालिका अधिकारी व पोलिसांना पैसे वाटतो आणि स्वत:लाही ठेवतो,’’ असे या फेरीवाल्याने सांगितले. गिरगाव पंचे डेपोजवळ धंदा करणाऱ्यांकडून प्रतिदिन शंभर रुपये गोळा केले जातात. तिथे साधारण सव्वाशे फेरीवाले आहेत. दादर रेल्वे स्थानकाजवळ धंदा करणाऱ्यांकडून दोनशे ते तीनशे रुपये गोळा केले जातात, असे या फेरीवाल्याने सांगितले.

दक्षिण, मध्य मुंबईतल्या मोठय़ा बाजारपेठा असो किंवा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बाजारपेठा असो सर्वत्र पालिका, पोलिसांना हप्ता देऊन निर्धास्त धंदा करण्याची व्यवस्था हीच. त्यामुळे जमाल, बंगाली, राजूसारखे कैक झिरो नंबरचा सुळसुळाट शहरात आहे.

दिवसा अशी परिस्थिती असते, तर रात्रीचे चित्रही धक्कादायक आहे. येथे हप्ते घेणाऱ्यांत पोलिसांचे प्रमाण जास्त आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या खाद्यपदार्थाच्या गाडय़ांवरील विक्रेत्यांकडून हप्ते गोळा केले जातात. मध्य मुंबईत मध्यरात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत इडली-वडा, डोसे विकणाऱ्याने दिलेली माहिती धक्कादायक आहे. ‘‘मी गेल्या अकरा वर्षांपासून इथे धंदा करतो. पालिकेला मला एकही पैसा द्यावा लागत नाही; पण स्थानिक पोलिसांना मी महिन्याचे सुमारे ३० हजार रुपये वाटतो. वरिष्ठ निरीक्षकापासून बीट मार्शलपर्यंत त्या त्या हुद्दय़ाचे अधिकारी, कर्मचारी येतात आणि पैसे घेऊन जातात. पोलिसांची गाडी लागली की पैसे आणि सात-आठ प्लेट खाद्यपदार्थही नेतात,’’ अशी माहिती त्याने दिली.

दादरचा ज्यूस विक्रेता सांगतो की, परवान्यानुसार आम्ही रात्री बारानंतरही धंदा करू शकतो; पण पदपथांवर खुच्र्या लावतो, ग्राहकांची वाहने दुकानासमोर लागतात, त्यासाठी आम्ही पोलिसांना वीसेक हजार रुपये देतो. ही रक्कम नाही दिली तर कारवाई केली जाते. त्यापेक्षा पैसे दिले की निर्धास्तपणे धंदा करता येतो.