मुंबई: ज्या ज्या ठिकाणी टाळेबंदी उठविण्याची घाई करण्यात आली तेथे करोनाचा  प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुन्हा टाळेबंदीची वेळ आली. सध्या राज्यात करोनाची पहिलीच लाट आहे. कोणत्याही परिस्थितीत दुसरी लाट येऊ द्यायची नाही त्यासाठी सरसकट टाळेबंदी उठविण्याची घाई नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट के ले.

राज्यातील कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि   डॉ. राहुल पंडित यांच्यासोबत दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी  टाळेबंदी संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट के ली. करोनाचा सर्वाधिक फटका गरीबांना बसला याची आपल्याला पूर्ण कल्पना असून घाई गडबडीत शाळा सुरू के ल्या आणि जर शाळेत करोनाचा संसर्ग पसरला किंवा कार्यालये पूर्णपणे उघडल्यानंतर त्यात करोनाचा संसर्ग वाढला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही. दुसरी लाट  अधिक धोकायदाय असल्याने ती कशी थोपवायची याची तयारी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी टाळेबंदी उठविण्याची घाई झाली आहे. तिथे पुन्हा टाळेबंदी करावी लागत आहे. त्यामुळे संपूर्ण टाळेबंदी उठविण्याऐवजी  टप्प्या टप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

करोनाची लागण फक्त ज्येष्ठ नागरिकांना होते. लहान मुलांना होत नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अमेरिकेत शाळा सुरू झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर मुलांना करोनाची लागण झाली. त्यामुळे सहा महिन्यांच्या बाळापासून ते कोणत्याही वयाच्या व्यक्तीला करोना होऊ शकतो. त्यामुळे अति आत्मविश्वास बाळगून चालणार नाही, असेही  ठाकरे यांनी सांगितले.