X

मध्य रेल्वेचा ‘वक्तशीर’पणा जैसे थे!

गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै यांदरम्यान मध्य रेल्वेवर उपनगरीय सेवांचा वक्तशीरपणा ८४ टक्के एवढा होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सुधारणा नाही; सूचनांकडे दुर्लक्ष

सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री पदाचा भार स्वीकारल्यापासून सातत्याने मुंबईच्या उपनगरीय वेळापत्रकाच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्याबद्दल अधिकाऱ्यांना दट्टय़ा लावला आहे. तरीही यंदा एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत काडीचाही फरक पडला नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खासदारांची समिती, वेळोवेळी महाव्यवस्थापकांना वक्तशीरपणा सुधारण्याचे आदेश, आदी सर्व गोष्टी ‘पालथ्या घडय़ावर पाणी’ ठरत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मध्य रेल्वेचे नवनियुक्त महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनीही आता उपनगरीय सेवांचा वक्तशीरपणा सुधारण्यावरच भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या उपनगरीय सेवेशी जवळचा संबंध असलेल्या सुरेश प्रभू यांची नियुक्ती रेल्वेमंत्री म्हणून झाल्यानंतर मुंबईच्या उपनगरीय सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा होती. मात्र वक्तशीरपणा बिघडल्याने मध्य रेल्वेवर प्रभू यांच्या काळात आतापर्यंत तीन ते चार वेळा प्रवाशांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै यांदरम्यान मध्य रेल्वेवर उपनगरीय सेवांचा वक्तशीरपणा ८४ टक्के एवढा होता. त्याच दरम्यान भावेश नकाते प्रकरण घडल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गर्दीवर तसेच दिरंगाईवर उपाययोजना करण्यासाठी मध्य तसेच पश्चिम रेल्वेवर खासदार, रेल्वे कार्यकर्ते आणि रेल्वे अधिकारी यांची समितीही नेमली होती. या समितीने सुचवलेल्या उपायांची अंमलबजावणीही सुरू झाली. याच दरम्यान रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तात्कालीन महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनाही वक्तशीरपणा सुधारण्याबाबत अनेक सूचना व आदेश दिले होते.

समितीने केलेल्या शिफारशींवर कार्यवाही, महाव्यस्थापकांनी उपनगरीय सेवेत जातीने घातलेले लक्ष आदी गोष्टींनंतर यंदा एप्रिल ते जुलै या दरम्यानच्या वक्तशीरपणाची टक्केवारी ८४ टक्के एवढीच आहे. त्यामुळे खासदारांनी लक्ष घालूनही मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा सुधारत नसल्याने आणखी काय करायचे, हा प्रश्न उपनगरीय प्रवाशांना पडला आहे.

दरम्यान, बदलापूर येथील रेल्वे रोको आंदोलनानंतर मध्य रेल्वेचे नवनियुक्त महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्यावर भर देण्याचे जाहीर केले. त्यासाठी सिग्नल, ओव्हरहेड वायर आणि गाडीचे डबे यांची देखभाल-दुरुस्ती करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या उपाययोजनांनंतर तरी मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा प्रवासी करत आहेत.