मुंबई विद्यापीठाच्या शुल्क समितीने शुल्कवाढीसाठी नेमून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांनाच केवळ शुल्कवाढीला मान्यता दिली जाईल, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले.
‘शिवसेना’प्रणीत ‘युवा सेना’ या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी वायकर यांची भेट घेऊन शुल्कवाढीला विरोध केला. विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना सरसकट शुल्कवाढ देण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या शुल्क निश्चितीसाठी निकष ठरवून दिलेल्या समितीने दिला आहे. मात्र, आपल्याला विश्वासात न घेता हा प्रस्ताव देण्यात आल्याचा या समितीवरील युवा सेनेचे सदस्य (अधिसभा सदस्य म्हणून नियुक्त केलेले) आणि बुक्टू या प्राध्यापकांच्या संघटनेचे म्हणणे आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत सरसकट सर्व महाविद्यालयांना १० टक्के शुल्कवाढ करू देण्याचा हा प्रस्ताव आहे. तसेच, पुढील दोन वर्षांतही प्रत्येकी ५ टक्के शुल्कवाढ करू देण्याचेही या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रस्तावावर आक्षेप घेत सरसकट सर्व महाविद्यालयांना शुल्कवाढ करू देण्यास युवा सेनेने विरोध दर्शविला आहे. जी महाविद्यालये निकष पूर्ण करत नाहीत, त्यांना शुल्कवाढ का करू द्यायची, असा युवा सेनेचा आक्षेप आहे. ही भूमिका मान्य करत वायकर यांनी सरसकट सर्व महाविद्यालयांना शुल्कवाढ करू देऊ नये, असे आदेश विद्यापीठाचे बीसीयूडीचे संचालक राजपाल हांडे यांना दिले.
ज्या महाविद्यालयांना शुल्कवाढ हवी आहे त्यांनी विद्यापीठाकडे अर्ज करावा. या अर्जानुसार विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये जाऊन त्यांनी निकषांची पूर्तता केली आहे की नाही याची पाहणी करावी आणि त्यानंतरच शुल्कवाढीला मान्यता द्यावी, अशी सूचना वायकर यांनी केली. या बैठकीला हांडे यांच्यासह माजी प्र-कुलगुरू नरेशचंद्र, अधिसभा सदस्य महादेव जगताप, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, नीलिमा भुर्के, प्रदीप सावंत उपस्थित होते.