पहिल्या २०० शिक्षणसंस्थांच्या ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ या जागतिक क्रमवारीत या वर्षीही अमेरिकेतील एमआयटी आणि हावर्ड विद्यापीठाने अव्वल क्रमांक पटकावत आपले स्थान अबाधित ठेवले. या वर्षीही भारतातील एकाही शिक्षणसंस्थेला या क्रमवारीत जागा मिळविता आली नाही. उलट गेल्या वर्षी २१२व्या स्थानावर असलेल्या दिल्लीच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ची (आयआयटी) घसरण यंदा २२२व्या स्थानावर झाली आहे.
क्यूएसमध्ये जगभरातील ८०० संस्थांची त्यांच्या दर्जानुसार क्रमवारी लावण्यात आली आहे. त्यात नेहमीप्रमाणे अमेरिकी विद्यापीठांचाच वरचष्मा राहिला. एमआयटीने गेल्या वर्षीचाच पहिला क्रमांक कायम राखला आहे. तर हार्वर्डने इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला. विषयांची विविधता, संशोधन आणि शैक्षणिक दर्जा या आधारे जगभरातील तीन हजार शिक्षणसंस्थाचा अभ्यास करून ही क्रमवारी ठरविण्यात येते.
या ८०० संस्थांमध्ये भारतातील ११ संस्थांचा (सर्व आयआयटी) समावेश आहे. या क्रमवारीत मुंबई-आयआयटी (२३३), कानपूर-आयआयटी (२९५), मद्रास-आयआयटी (३१३) आणि आयआयटी-खरगपूर (३४६) अशा स्थानांवर आहेत. या क्रमवारीतील भारतीय संस्थांची कामगिरी तुलनेत स्थिर आहे. परंतु, जागतिक क्रमवारीत येण्यासाठी भारतीय संस्थांना आणखी मेहनत घ्यावी लागेल, असे क्यूएस या ब्रिटीशस्थित कंपनीचे संशोधन प्रमुख बेन सॉटर यांनी स्पष्ट केले. भारतात शिक्षणावर दिला जाणारा भर पाहता क्यूएसमध्ये येत्या काळात भारतीय संस्थांकरिता ‘ब्रिक्स’ ही स्वतंत्र क्रमवारी सुरू करण्यात येणार आहे.
सध्या आशियाई देशांसाठी स्वतंत्रपणे क्रमवारी तयार केली जाते. यात पहिल्या ५० संस्थांमध्ये दिल्ली-आयआयटी आणि मुंबई-आयआयटी अनुक्रमे ३८ आणि ३९व्या स्थानावर आहे. त्या खालोखाल कानपूर-आयआयटी (५१) आणि रूरकी-आयआयटी (६६) आहेत. आशियाई क्रमवारीत हाँगकाँग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. त्या खालोखाल चीन, जपान आणि कोरिया येथील संस्था आहेत.
जागतिक क्रमवारीत पहिल्या ४००मध्ये भारताच्या केवळ चार आयआयटीचा समावेश आहे. आशियाई क्रमवारीचा विचार करता अनेक संस्था गेल्या वर्षीच्या तुलनेत खाली घसरल्या आहेत. यात भारतातील पाच संस्थाचाही समावेश आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कामगिरीत सुधारणा
आशियाई क्रमवारीत मुंबई विद्यापीठाच्या गेल्या वर्षीच्या कामगिरीच्या तुलनेत काहिशी सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठ या क्रमवारीत १५१-१६० दरम्यान होते. यंदा विद्यापीठ १४०व्या स्थानावर आहे. दिल्ली विद्यापीठाने मात्र मुंबईला मागे टाकत ८०वे (गेल्या वर्षी ७८) स्थान पटकावले आहे. तर कोलकता विद्यापीठाने आपले गेल्या वर्षीचे १४३वे स्थान कायम ठेवले आहे.