सामाजिक कार्यकर्ते अरुण फरेरा यांचा उच्च न्यायालयात दावा

शहरी नक्षलवाद

मुंबई : एल्गार परिषद तसेच कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी आपला काहीही संबंध नाही आणि हा संबंध असल्याचा आरोप करणारा एकही पुरावा पोलिसांकडे नाही, असा दावा शहरी नक्षलवादाच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण फरेरा यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात केला.

फरेरा यांच्यासह वेर्णन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांनीही जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर त्यांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे.

फरेरा यांच्यासाठी अ‍ॅड्. सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद केला. त्या वेळी आपण ‘भारतीय असोसिएशन पीपल्स लॉयर्स’ (आयएपीएल) या संस्थेचे सदस्य आहोत. याच संस्थेचे पदाधिकारी असलेल्या आणि या प्रकरणी सहआरोपी असलेल्या सुरेंद्र गडलिंग यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. याच कारणास्तव आपल्याला अटक करण्यात आल्याचा दावाही फरेरा यांच्यातर्फे करण्यात आला.

आपण वकील आहोत आणि आदिवासींसाठी काम करतो. २००७ मध्येही आपल्याला अटक करण्यात आली होती. पाच वर्षे नागपूर कारागृहात काढल्यानंतर २०१२मध्ये न्यायालयाने आपली सुटका केली होती. त्या वेळी गडलिंग हे आपली बाजू न्यायालयात मांडत होते. त्यामुळेच गडलिंग यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित झाले. परंतु शहरी नक्षलवादप्रकरणी गडलिंग यांना अटक झाल्यानंतर आपण आणि अन्य काही सहकाऱ्यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले. त्यानंतर गडलिंग यांच्याशी असलेल्या संपर्कामुळे पोलिसांनी पुढे या प्रकरणी आपल्यालाही अटक केली. सुरुवातीला या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात आपल्या नावाचा समावेश नव्हता. मात्र पुरवणी आरोपपत्रात आपल्याला आरोपी दाखवण्यात आले. आपल्याला आरोपी दाखवण्यासाठी नऊ पत्रे ेआणि दोन साक्षीदारांचे जबाब पुरावे म्हणून सादर करण्यात आले. पण या पुराव्यांतून आपला शहरी नक्षलवादाशी संबंध असल्याचे कुठेही स्पष्ट होत नाही, असा युक्तिवादही फरेरा यांच्यातर्फे न्यायालयापुढे करण्यात आला.

देशभर नक्षलबारी चळवळीचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी बैठक वा परिषद घेण्यात आली होती, असा पोलिसांचा दावा आहे. मात्र ही बैठक झाल्याचा कुठलाही पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही. शिवाय ‘आयएपीएल’ ही काही बंदी घालण्यात आलेली संस्था नाही, तर ती आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था असून त्यात बऱ्याच नामांकित वकिलांचा समावेश आहे, असेही फरेरा यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच नक्षलबारी चळवळीचा सुवर्णमहोत्सव साजरा केला असला तरी त्यात बेकायदा असे काही नाही, असा दावाही फरेरा यांच्यातर्फे करण्यात आला.