उत्तर मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली या भागात रुग्ण वेगाने वाढत असले तरी या भागात संपूर्ण टाळेबंदी करण्यात आलेली नसून केवळ ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्या ठिकाणी व लगतच्या परिसरांपुरतीच टाळेबंदी लागू करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले आहे.

पालिकेच्या ‘परिमंडळ ७’ मध्ये कांदिवली, दहिसर, बोरिवली या परिसरांचा समावेश होतो. या भागात गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणावर रुग्ण सापडत असल्यामुळे पालिकेच्या यंत्रणेने आपले लक्ष या भागावर केंद्रित केले आहे. मात्र नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अशा आशयाचे संदेश अग्रेषित करू नयेत, असे आवाहन ‘परिमंडळ ७’चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी केले आहे.

या भागातील करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासन व येथील पोलीस सहआयुक्तांची नुकतीच संयुक्त बैठक पार पडली.

३२२ नागरिकांचा मृत्यू  परिमंडळ ७ मध्ये दहिसर, बोरिवली, कांदिवलीत मिळून करोना रुग्णांची संख्या ४,९५३ असून यापैकी १,९३९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३२२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या २,६९२ रुग्ण असून ज्यापैकी झोपडपट्टी परिसरांमध्ये २,२१३; तर इमारतींमध्ये २,७४९ रुग्ण आहेत.

कांदिवलीत आतापर्यंत १,९६५ करोनाचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ७३० रुग्ण करोनामुक्त झाले.

बोरिवलीत  १,७८१ करोना रुग्ण आढळून आले असून यापैकी ७६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दहिसरमध्ये १,२०७  रुग्ण आढळून आले असून, यापैकी ४४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.