दसऱ्याच्या दिवशी मित्रमंडळींना, आप्तांना भेटण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना लोकलचा प्रवास सुखद व्हावा यासाठी रविवार असूनही १३ ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
एरवीही रोजच्या धावपळीत मित्रांना, नातेवाईकांना भेटण्यासाठी वेळ मिळत नसल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीपासून कर्जत-कसाऱ्यापर्यंत राहणारे महामुंबई प्रदेशाचे रहिवासी रविवारी वेळ काढून बाहेर पडतात. त्याचदिवशी देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक घेत असल्याने लोकांचे चांगलेच हाल होतात.
यंदा दसरा नेमका रविवारी आला. त्यामुळे आता दसऱ्याच्या दिवशी मित्रमंडळींना नातेवाईकांना भेटण्यासाठी जाण्याचा बेत कसा मार्गी लावायचा याची चिंता मुंबईकरांना सतावत होती. पण लोकांची ही अडचण ओळखून रेल्वे प्रशासनाने रविवार १३ ऑक्टोबर रोजी मध्य व पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे.
पश्चिम रेल्वेने आपले छोटेसे काम शनिवारी मध्यरात्रीच उरकून घेतले. वसई आणि विरारदरम्यानच्या या मेगाब्लॉकमध्ये लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या.