कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेकडून मागे घेण्यात आल्यावर मांसाहार बंदीचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपल्याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याच वेळी शिवसेना पर्युषण पर्वाविरोधात नसून जैन मंदिरांपुढे आंदोलन करणारे शिवसेना कार्यकर्ते नसल्याचे स्पष्टीकरण युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
जैन मंदिरांपुढे मांसाचे तुकडे ठेवण्यात आल्याची छायाचित्रे सोशल मीडियावरून प्रसारित होत आहेत. त्यावर शिवसेना कधीही जैन मंदिरांपुढे अशा पद्धतीने निदर्शने करणार नाही वा त्याला पाठिंबाही देणार नाही. जैन मंदिरांच्या पावित्र्याला बाधा येईल, अशा कोणत्याही बाबींना शिवसेनेचे समर्थन नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पर्युषण पर्व पाळण्यास शिवसेनेचा विरोध कधीही नव्हता. सक्तीच्या शाकाहाराची भूमिका मान्य नव्हती; पण आता शिवसेनेच्या दृष्टीने हा विषय संपला असून तो आम्हाला अधिक वाढवायचा नाही, असे उद्धव म्हणाले.