‘आयसीएमआर’ची सूचना

मुंबई : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी करणे आता बंधनकारक करू नये, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने जाहीर केलेल्या (आयसीएमआर) चाचणीच्या नव्या नियमावलीत सूचित केले आहे. करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रयोगशाळांवरील चाचण्यांचा ताण वाढत असल्याने ‘आयसीएमआर’ने नियमावलीत काही बदल केले आहेत.

देशात ‘आरटीपीसीआर’, ‘सीबीनॅट’ यासह इतर करोनाच्या चाचण्या करण्यासाठी सध्या २,५०६ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. दरदिवशी तीन पाळ्यांमध्ये काम केल्यास सुमारे १५ लाख चाचण्या करण्याची क्षमता या प्रयोगशाळांची आहे. सध्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दरदिवशीच्या चाचण्यांची संख्याही वाढत आहे. त्यात प्रयोगशाळांमधील कर्मचाऱ्यांनाही बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रयोगशाळांवरील ताण वाढत आहे. तेव्हा चाचण्यांची संख्या कमी करण्यासाठी अनावश्यक चाचण्या करू नयेत असे या नियमावलीत म्हटले आहे. चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठीच्या उपाययोजना सुचविताना प्रतिजन चाचण्यांचा वापर सर्व सरकारी आणि खासगी आरोग्यसेवांमध्ये लागू करता येईल असे या नियमावलीत म्हटले आहे.

नव्या सूचना

प्रतिजन किंवा आरटीपीसीआर चाचणीमध्ये बाधित असल्याचे निदान झाल्यास त्या व्यक्तीची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करू नये.

करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांचीही चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

प्रयोगशाळांवरील चाचण्यांचा ताण कमी करण्यासाठी आरोग्यदृष्ट्या कोणतीही तक्रार नसलेल्या व्यक्तीची आंतरराज्य प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्याची अट पूर्णपणे काढून टाकता येईल.

कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींनी मात्र प्रवास करताना करोना प्रतिबंध नियमांचे पालन करावे.

रुग्णालये, कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक केंद्र इत्यादींसह शहरात ठिकठिकाणी प्रतिजन चाचण्या उपलब्ध कराव्यात. ही सुविधा २४ तास सुरू असावी.