News Flash

दुसरीचा अभ्यास शिकवायचा कसा?

यंदाच्या शैक्षणिक वर्षांची सुरूवात दुसरीच्या गणिताच्या पुस्तकावरील वादाने झाली

शिक्षक संभ्रमात; पहिले सत्र संपले तरी नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण नाही

मुंबई : गुणवत्ता वाढ, दर्जा यांवर चार पानी शासन निर्णय काढणाऱ्या शिक्षण विभागाला प्रत्यक्षात गुणवत्तेची पर्वाच नसल्याचे चित्र आहे. शाळांचे पहिले सत्र संपले तरी शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे नव्या पाठय़पुस्तकांचे अध्यापन करताना नेमके काय अपेक्षित आहे, याबाबत ते अद्यापही संभ्रमात आहेत.

यंदाच्या शैक्षणिक वर्षांची सुरूवात दुसरीच्या गणिताच्या पुस्तकावरील वादाने झाली. विद्यार्थ्यांना दशक आणि दोन अंकी संख्या समजण्यासाठी एक नवा पर्याय गणिताच्या अभ्यास समितीने पाठय़पुस्तकात दिला. त्यावरून त्याची आवश्यकता, ती पद्धत कशी वापरावी याबाबत वादंग निर्माण झाला. त्याबाबतच्या शिक्षकांना शंका असल्यास त्याला प्रशिक्षणामध्ये उत्तर देण्याचे शिक्षण विभागाने सांगितले होते.

याशिवायही गणिताच्या पुस्तकात अनेक बदल केले आहेत. इंग्रजी, प्रथम भाषा मराठीचे पुस्तकही बदलण्यात आले आहे. त्याबाबतही शिक्षकांना अनेक शंका आहेत. पुस्तके बदलल्यानंतर बदल का करण्यात आले आहेत, पुस्तकाच्या अनुषंगाने शिकवण्याच्या पद्धतीत काय बदल असावेत, घटक शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणते कौशल्य येणे अपेक्षित आहे, अशा अनेक बाबींची स्पष्टता येण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित असते. मात्र पहिले सत्र संपले तरीही दुसरीच्या पाठय़पुस्तकांचे प्रशिक्षण विभागाने घेतलेले नाही. शिक्षकांनी मागणी करूनही विभागाने प्रशिक्षण घेण्यात दिरंगाई केली आहे.

तीन महिन्यांनंतर निर्णय

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच प्रशिक्षण देण्याची मागणी शिक्षकांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. वर्ष सुरू होण्यापूर्वी नाही, तरी किमान वर्ष सुरू झाल्यावर प्रशिक्षण लगेच होणे अपेक्षित होते. त्यानुसार प्रशिक्षणाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जुलै अखेरीस प्रशिक्षणासाठी शासनाकडे मंजुरी मागितली होती. शासनाने १ ऑक्टोबरला प्रशिक्षण घेण्यास मंजुरी दिली आहे. मात्र आता निवडणुका आणि त्यानंतर दिवाळी यांमुळे या सत्रात तरी प्रशिक्षण होण्याची शक्यता नाही.

शिक्षकांना गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. ऑनलाईन प्रशिक्षण एकतर्फी होत असल्याचा आक्षेप शिक्षकांनी गेल्यावर्षी घेतला होता. मात्र तरीही यंदाही ऑनलाईनच प्रशिक्षण दिले जाणार आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच ‘वंदे गुजरात’ वाहिनीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याची परवानगी शासनाने दिली आहे.

प्रशिक्षण निधीत यंदा ८ कोटींची कपात

केंद्राच्या समग्र शिक्षण अभियानांतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात येते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ही तरतूद घटली आहे. शिक्षक प्रशिक्षणासाठी साधारण ४४ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ८ कोटी रुपयांची कपात करण्यात आली असून, गेल्यावर्षी साधारण ५२ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी गेल्यावर्षीच्या निधीपैकी जवळपास ८ कोटी रुपये शिल्लक राहिले असल्याचेही समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:01 am

Web Title: no new course training to teachers zws 70
Next Stories
1 बंडखोरांचे आव्हान कायम!
2 गृहनिर्माण संस्थांच्या आवारात सशुल्क वाहनतळ
3 पालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला एक कोटीची भरपाई
Just Now!
X