रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. यावरून आता भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या कारवाईवरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली जात आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितलं आहे. शिवाय, त्यांनी तसं ट्विट देखील केलेलं आहे.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

तसेच, ही केस बंद झाली होती. मात्र वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या पत्नीने नाईक यांनी केस पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस परत सुरू करण्याची परवानगी न्यायालयाने त्यांना दिली. असल्याचंही यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामींच्या वकिलाचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले...

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.