अश्विनी भिडे यांचे प्रतिपादन, एकाच प्रकारच्या ८० हजार तक्रारींबाबत साशंकता

कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाप्रमाणेच आरे मेट्रो कारशेडही जाणार, अशी विरोधी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतरही आरेमध्येच कारशेड होईल, दुसरी जागाच नाही, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आरे येथे मेट्रो कारशेड बांधण्याबाबत बाधित होणाऱ्या व्यक्तींकडून हरकती सूचना मागिवल्या होत्या, त्यावर ‘झटका डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या ८० हजार तक्रारींबाबत अश्विनी भिडे यांनी शंका व्यक्त केली. कार शेड तिथून हटवा, झाडे तोडू नका, अशा एकाच प्रकारच्या तक्रारी होत्या. खऱ्या तक्रारी असतील तर त्याबाबत काही आक्षेप नाही, परंतु संख्या वाढवून दाखविणे, हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तक्रारी करणारी माणसे आहेत का, अशी शंका घ्यायला वाव आहे. तरीही मेट्रो कारशेडसाठी आरेची जागा का निवडली, झाडे तोडली तर भरपाई म्हणून आम्ही काय करणार आहोत, याबाबत त्या सर्व ८० हजार तक्रारींना उत्तरे दिली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  आपल्या वैयक्तिक ईमेलवर तीन हजार तक्रारी आल्या. त्यावर सुनावणी घेतली. मात्र सुनावणीसाठी फक्त ४०० लोक हजर होते. त्यांनाही आम्ही उत्तरे पाठविली आहेत, असे भिडे यांनी सांगितले.

आरे येथे मेट्रो कार शेडवरून सध्या वाद उफाळून आला आहे. विद्यार्थी, तसेच काही स्वयंसेवी संस्थांनी आरे वसाहतीतील झाडे तोडून मेट्रो कारशेड बांधण्यास विरोध केला आहे. मुंबईत त्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. शिवसेनेनेही आरे येथे कारशेड बांधण्यास विरोध केल्याने हा वाद राजकीय आखाडय़ात पोहोचला आहे.  उद्धव ठाकरे यांनी नाणारप्रमाणे आरेतून मेट्रो कारशेड जाणार, असा सूचक इशारा दिला. त्यानंतरही मेट्रो कारशेड आरे वसाहतीतच होणार, असे भिडे यांनी म्हटले आहे.

८१ टक्के मुंबईकरांचा वृक्षतोडीला विरोध : आरे वृक्ष तोडीला ८१ टक्के मुंबईकरांचा विरोध असल्याचे सेंट झेवियर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. या विद्यार्थ्यांनी शहराच्या विविध भागांतील १ हजार लोकांचे मत जाणून घेतले. यात ५४ टक्के मुंबईकरांनी झाडे वाचवण्यासाठी कारशेड अन्यत्र वळवण्याचे मत नोंदवले असल्याचे माजी नगरसेवक अवकाश जाधव यांनी सांगितले.

राज्य सरकारने आम्हाला मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीतील जागा दिली आहे, तांत्रिकदृष्टय़ा तेथेच कारशेड होईल, कारण दुसरी जागाच नाही, असे  अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

– अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो