बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी विधानसभाध्यक्षांकडून अद्याप परवानगी न मिळालेली नाही. मात्र तीन महिन्यापर्यंत ही परवानगी मिळाली नाही तर गुन्हे अन्वेषण विभागाला न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपपत्र दाखल करण्याची मुभा आहे. ही मुदत आणखी दोन महिन्यांनंतर संपत असल्यामुळे त्यानंतर गुन्हे विभागाकडून आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
पोलिसांनी कृपाशंकर यांच्यासह त्यांचे पुत्र नरेंद्र सिंग आणि जावई विजयकुमार प्रताप सिंग यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्याची कारवाईही करावी लागणार आहे. आरोपपत्र दाखल करण्याच्या वेळी त्यांना अटक करणे आवश्यक आहे. परंतु याबाबत आर्थिक गुन्हे विभागातील सूत्रांनी काहीही माहिती सांगण्यास नकार दिला.
पोलिसांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कृपाशंकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या कारवाईला सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली सुरू आहे.
आर्थिक गुन्हे विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृपाशंकर सिंग यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने सव्वा महिन्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहिले आहे. परंतु अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी तीन महिन्यांपर्यंत वाट पाहावी, असे न्यायालयाचे आदेश आहेत.