आरोग्य खात्यातील शुक्राचार्याचा तुघलकी निर्णय

पालिका प्रशासनाने जन्म-मृत्यू नोंदणी, तसेच नोटीस कारकून पदासाठी निवड भरती जाहीर करीत पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खाते आणि उपनगरीय रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची दालने खुली केली आहेत. यापूर्वी याच पदासाठी अन्य विभागांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे मार्ग मोकळे होते. पण यावेळी मात्र प्रशासनाने अन्य विभागांतील कामगार, शिपाई इत्यादींना जन्म-मृत्यू नोंदणी, तसेच नोटीस कारकून पदाच्या निवड भरतीचे दरवाजे बंद केले असून आरोग्य खात्यातील शुक्राचार्याच्या या तुघलकी निर्णयाबद्दल पालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

मुंबई महापालिकेतील रिक्त असलेल्या जन्म-मृत्यू नोंदणी, तसेच नोटीस कारकून पदावर आतापर्यंत निवड पद्धतीने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत होती. प्रशासनाचे निकष पूर्ण करणाऱ्या पालिकेतील विविध विभागांतील कामगार आणि शिपायांना या निमित्ताने पदोन्नतीची संधी मिळत होती. मात्र यावेळी प्रशासनाने ५० रिक्त जन्म-मृत्यू नोंदणी, तसेच नोटीस कारकून पदांवर निवड पद्धतीने भरती जाहीर केली आहे. जन्म-मृत्यू नोंदणी, तसेच नोटीस कारकून पदावर भरती होणार यामुळे पालिकेतील सर्वच विभागांतील कामगार, शिपाई खूश झाले होते. मात्र या भरतीसंदर्भात प्रशासनाने काढलेले परिपत्रक पाहताच आरोग्य खाते आणि उपनगरीय रुग्णालयांतील चतुथीश्रेणी कर्मचारी वगळता अन्य विभागांतील समस्त कामगार आणि शिपाई वर्गाचे डोळेच पांढरे झाले. प्रशासनाने अन्य विभागांतील कामगार आणि शिपायांचे या पदावरील निवड पद्धतीने पदोन्नती मिळविण्याचे दोर कापून टाकले आहेत.

जन्म-मृत्यू नोंदणी, तसेच नोटीस कारकून पदाच्या निवड भरतीमध्ये आरोग्य खाते आणि उपनगरीय रुग्णालयांमधील कामगार आणि शिपायांनाच संधी देण्याचा निर्णय आरोग्य खात्यातील शुक्राचार्यानी घेतला आहे. त्यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

  • पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामध्ये काही पदांसाठी पालिकेच्या विविध विभागांतील कामगार आणि शिपायांना संधी देण्यात आली होती.
  • मुंबईत आपत्ती समयी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सेवेत पदोन्नतीच्या माध्यमातून रुजू झाल्यानंतर चतुर्थश्रेणी कर्मचारी खूश झाले. मात्र आता आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केवळ आपले खाते आणि उपनगरीय रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच पदोन्नती मिळविण्यासाठी या पदाच्या निवड पद्धतीमध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याने पालिका वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
  • जन्म-मृत्यू नोंदणी, तसेच नोटीस कारकून पदाच्या निमित्ताने प्रगतीची एक शिडी चढण्याची संधी मिळत होती. परंतु या संधीबाबत प्रशासनाने नकारघंटा वाजविली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील काही पदांसाठी अन्य विभागांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी कोटा पद्धतीने आरक्षण ठेवले आहे. तशी व्यवस्था जन्म, मृत्यू नोंदणी, तसेच नोटीस कारकून पदांच्या निवड भरतीमध्ये ठेवावी, अशी मागणी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.