राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला ५०-५० टक्के जागा लढवण्याचा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांना जागा वाटपासाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा होती.

अशोक चव्हाण यांनी वृत्त फेटाळून लावत अद्याप राष्ट्रवादीसोबत कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नसून आगामी निवडणुकीबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं सांगितलं आहे.

शरद पवार यांनी काँग्रेसला 50-50 टक्के जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती होती. शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात एक बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 50-50 टक्के जागांवर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव राहुल गांधींसमोर ठेवला होता असं सांगण्यात येत होतं.

सोमवारी बोलताना शरद पवार यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला होता. पवार म्हणाले, जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांचा पंतप्रधानपदाचा कोणीही उमेदवार नसेल.