देशभरात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असला तरी केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार महाराष्ट्र मात्र कोरडाच राहणार आहे. येत्या पाच दिवसात कोकण किनारपट्टीत मध्यम स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता असली तरी उर्वरित राज्यात मात्र पावसाच्या केवळ तुरळक सरी पडणार आहेत. वेधशाळेचा अंदाज खरा ठरल्यास राज्यातील जलसंकट तीव्र होऊ शकेल.
गेले काही दिवस केवळ एखादी सर बरसून आकाशातून पुढे जात असलेले ढग उत्तर भारतात एकवटले आहेत. उत्तर प्रदेशच्या दक्षिणेकडून मध्य प्रदेशपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबामुळे काश्मीरपासून ओडिसापर्यंत मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कर्नाटक आणि केरळलाही जोरदार सरी येत आहेत. मात्र या दरम्यानच्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या भागात पावसाचा जोर वाढणार नसल्याचे वेधशाळेच्या अंदाजातून दिसत आहे. मध्य प्रदेशवरील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथे अतिवृष्टी होत आहे. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर, पूर्व राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड अशा राज्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खाली दक्षिणेलाही कर्नाटक व केरळच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस आहे. मात्र उत्तर व दक्षिणेला पाऊस पडत असताना महाराष्ट्र मात्र कोरडाच राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीला असल्याने कोकणात येत्या पाच दिवसात मध्यम स्वरूपाच्या सरी तसेच काही ठिकाणी जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. मात्र कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात केवळ तुरळक सरी येण्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. उत्तरेतील कमी दाबाच्या प्रभावामुळे विदर्भात हलक्या सरी येतील, मात्र त्यांचा जोर वाढणार नाही.

मुंबई हवामानशास्त्र विभागानेही कोकणवगळता राज्याच्या इतर भागात तुरळक सरींचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान कोकणात राजापूर, रोहा, चिपळूण, लांजा येथे मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. मुंबई व परिसरात शनिवारी दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या.