मुंबई आणि उपनगरांमध्ये बुधवारी दिवसभर ढगांची गर्दी होती, मात्र पावसाचा जोर राज्याच्या इतर भागांतच होता. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्य़ात सर्वत्र हजेरी लावली. या पावसाने दुष्काळाची छाया जाणवू लागलेल्या या भागाला जलदिलासा मिळाला आहे. पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसाने तब्बल दीड महिन्यांच्या खंडानंतर बुधवारी हजेरी लावली. वरसगाव धरणावर ३८ मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत धरणावर १९ मिलिमीटर, तर खडकवासला धरणावर ९ मिलिमीटरची नोंद झाली. लातूर तालुक्यातील बाभळगाव व निलंगा तालुक्यातील पानचिंचोली मंडळांत ७५ मिमी पाऊस झाल्याने ओढेनाल्यांना चांगलेच पाणी आले आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे यंदा विदर्भातील खरीप हंगामाची स्थिती मात्र अत्यंत विदारक बनली आहे. विदर्भाच्या काही भागात दर आठ दिवसांनी येत असलेला पाऊस पिकांना जीवदान देत असला तरी उत्पादन वाढीच्या दृष्टीने फारसा उपयोगी नाही, असे बोलले जात आहे.