मुंबई : भल्यामोठय़ा कढईत रटरटत तळला जाणारा मालपुआ, एखाद्या सैनिकासारख्या शिस्तीत मांडल्या जाणाऱ्या छोटय़ा पण सुबक वाटय़ांतील फिरनी, रस्तोरस्ती मांडलेल्या भट्टीतून दरवळणारा कबाबांचा गंध, नवनवीन रंग,चवीच्या मिठाया.. मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना सुरू झाला की खाद्यभक्तांना ओढ लागते ती या खाद्यजत्रेची. दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रस्त्यावर रमजानच्या महिन्यात रात्रभर चालणारी खाद्यमुशाफिरी न अनुभवलेला अस्सल खवय्या मिळणे कठीणच. पण सलग दुसऱ्या वर्षी या खाद्यश्रीमंतीला मुकावे लागले आहे. करोनाचा कहर वाढू लागल्यामुळे लागलेल्या निर्बंधांमुळे रमजान मास सुरू असतानाही मोहम्मद अली रस्त्यावर मात्र शुकशुकाट दिसतो.

करोनाचा प्रादुर्भावर वाढू लागल्यानंतर गेल्या वर्षी कडक टाळेबंदी लागू झाली. याचा फटका अन्य सणांप्रमाणे रमजान ईदलाही बसला. मात्र, त्याहूनही मोठे नुकसान झाले ते खवय्यांचे. रमजानच्या महिन्य़ात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थानी सजूनधजून जाणाऱ्या मोहम्मद अली रस्त्यावरील खाद्यानुभव घेण्यासाठी पनवेल, विरार, कर्जत येथून सर्वधर्मिय नागरिक येत असतात. मात्र, गेली दोन वर्षे त्यांची ही खाद्यवारी चुकली आहे. ोंदा सकाळी ७ ते ११ या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असल्याने हा बाजारही ओस पडला आहे. नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त लागू केला आहे. दरवर्षी येथील दुकानांचा दरदिवशी लाखो रुपयांचा व्यवसाय होत होता. यंदा मात्र रमजानच्या कालावधीत या बाजारपेठेत होणारी कोटय़वधी रुपयांची उलाढाल यंदा पुरती थंडावली आहे.

दरवर्षी इथे उपाहारगृहांच्या बाहेर ताजेपदार्थ बनवून विकले जातात. यंदा रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ विकण्यास मनाई आहे. तसेच उपाहारगृहांमध्येही केवळ पार्सल सेवा उपलब्ध असल्याने अर्धे दार बंद ठेवून ही सेवा दिली जात आहे. त्यातही रमजानचे खास पदार्थ क्वचितच एखाद्या उपाहारगृहात आहेत. काही किरकोळ विक्रेते छोटेछोटे गाळे घेऊन खाद्यपदार्थ विक्री करत आहेत. परंतु त्यांनाही दोन-चार स्थानिक ग्राहकांचाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसले. एखादी फळाची गाडी, पावाचे दुकाने, मिठाईची एक-दोन दुकाने सायंकाळी इफ्तार करण्यापुरती खुली केली जातात, परंतु तासाभरात हा परिसर पुन्हा मौन धारण करतो.

खाद्य-श्रीमंती हरपली

जवळपास ४०० हून अधिक ताजे मांसाहारी पदार्थ आणि १०० हून अधिक गोड पदार्थानी मोहम्मद अली रस्त्यावरील गल्ल्या बहरत. मटण शिजवणाऱ्या हंडय़ा, कबाबचा गंध, तंदुरी, दालगोश्त, तुपाने संपृक्त झालेला मालपुवा, खव्याच्या जिलब्या, हलवा-पुरीचे मोठाले तवे ही या रस्त्यावरील रत्ने. सायंकाळ झाली की, भायखळ्यापासून ते भेंडी बाजारापर्यंतचा परिसर गर्दीने ओसंडून वाहू लागे. खाद्यजत्रेच्या ओढीने येणाऱ्यांमुळे येथील कपडे आणि अन्य बाजारांनाही तेजी येई. गेली दोन वर्षे मात्र हा रस्ता सुस्त आणि सुन्न दिसतो.

रात्री दुकाने सुरू करू द्या.

‘सकाळी ७ ते ११ च्या वेळेत मिठाई विक्रेत्यांना दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. पण रमजानचे उपवास संध्याकाळी सुटतात आणि त्याच वेळेस दुकाने खुली करण्यास बंदी असल्याने नुकसान झाले आहे. रमजानसाठी काही विशेष पदार्थ करणे तर दूरच, पण आहे त्याच पदार्थाची विक्री होत नाही,’ अशी खंत या परिसरातील प्रसिद्ध ‘सुलेमान मिठाईवाला’चे प्रतिनिधी चांद मोहम्मद यांनी व्यक्त केली.

उपाहारगृहांचीही मागणी घटली

यंदा परिस्थिती सुधारेल या आशेवर आम्ही होतो, परंतु पुन्हा करोना बळावल्याने सगळ्या आशा मंदावल्या. आता ग्राहकांची झुंबड नाही की रांग नाही. बाजार बंद असल्याने दुकानदारांकडून येणारी मागणीही नाही. संचारबंदीमुळे नागरिकांचा वावर कमी झाला आहे. बोटावर मोजण्याइतक्या ऑनलाइन मागण्या येतात. त्यामुळे यंदाचाही रमजान आनंद देणारा नाही, अशी प्रतिक्रिया शालिमार उपाहारगृहाच्या प्रतिनिधीने दिली.