मुंबईत ६०० ठिकाणी सुरू असलेली मोफत इंटरनेट सुविधा संथगतीमुळे निरुपयोगी

वाढत्या इंटरनेट वापराचा विचार करून राज्य सरकारने मुंबईतील तब्बल ६०० ठिकाणी सुरू केलेली मोफत वायफाय सुविधा तिच्या संथगतीमुळे नागरिकांसाठी निरूपयोगी ठरू लागली आहे. ‘आपले सरकार मुंबई वायफाय’ नावाच्या या सुविधेसाठी शहरात ठिकठिकाणी लावलेल्या फलकांखाली उभे राहिले तरी इंटरनेट उपलब्ध होत नाही. आतापर्यंत ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित होती. आता त्या जोडीला ‘सरकारी वायफाय, रेंजच नाय’ या उक्तीची भर पडली आहे.

मुंबई शहर ‘स्मार्ट’ व्हावे म्हणून राज्य सरकारकडून गेल्या काही महिन्यांत विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरात ‘आपले सरकार मुंबई वाय-फाय’ नावाने ६०० ठिकाणांवर इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आलेल्या या सेवेचा सर्वसामान्यांना मोठा फायदा मिळू शकतो. परंतु, बहुतांश ठिकाणी ही यंत्रणा रडतखडत सुरू असल्याचे दिसून येते. भांडुप, विद्याविहार, विक्रोळी, महापालिका, फोर्ट परिसरात आढावा घेतला असता ती काही मोजके अपवाद वगळता संथगतीने चालत असल्याचे दिसून आले.

भांडुप

भांडुप रेल्वे स्थानकावर लोकलमधून उतरल्यावर आपला फोन परिसरातील वाय-फाय शोधू लागतो. या यादीत ‘आपले सरकार मुंबई वाय-फाय’चे नाव येते. मात्र त्याची जोडणी अगदी दुय्यम दर्जाची असते. स्थानकाच्या बाहेर पडल्यावर जोडणी मिळेल या आशेने बाहेरील दुकानांपर्यंत गेल्यावरही जोडणी मिळत नाही. सरकारने जाहिर केलेल्या यादीत भांडुप पूर्वेचाही उल्लेख आहे. पूर्वेला बाहेर पडताच आपले सरकार वाय-फायची जोडणी झाली. जोडणीचा वेग हा ०.२९ एमबीपीएस ते १.८९ एमबीपीएस दरम्यान होता. हा वेग व्हॉट्सअ‍ॅप संवादासाठी पुरेसा आहे. फक्त छायाचित्र डाऊनलोड होण्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी लागते.

विक्रोळी पूर्व

या भागात रेल्वे स्थानकात उतरल्यावर अनेक वायफाय डोके वर काढतात. ‘आपले सरकार मुंबई वायफाय’ मात्र ‘रेंजमध्ये नाही’ असा संदेश येतो. स्थानकाच्या बाहेर रिक्षा स्टँडपर्यंत आल्यावर तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या खांबावर ‘आपले सरकार मुंबई वायफाय’ वापरा असे सांगणारा सरकारी फलक झळकतो. या फलकच्या खाली उभे राहूनपण आपले सरकार वायफायची जोडणी काही झाली नाही.

विद्याविहार पूर्व

महाविद्यालयीन तरुणांची मोठी गर्दी असलेले हे स्थानक. या स्थानकाच्या पूर्वेला स्काय वॉक सुरू होताच ‘आपले सरकार मुंबई वायफाय’ सुरू होते. येथील हॉटस्पॉटचा वेग ०.१७ एमबीपीएस ते ०.५१ एमबीपीएस या दरम्यान आहे. वेगामध्ये सातत्य असल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप संवाद, ब्राऊझिंग वेगाने होते. यामुळेच या स्कायवॉकवर अनेकांनी विसावा घेत वायफायचा वापर सुरू केला होता. या स्कायवॉकवर वायफायचा वापर करणारा खाजगी कंपनीतील विपणन अधिकारी संजय गुप्ता याने सांगितले की, मला घाटकोपर ते कुर्ला या परिसरात विपणनाची जबाबदारी आहे. हॉटस्पॉटमुळे आम्ही आमच्या खिशातील पैसे खर्च न करता आमच्या कार्यालयाशी संवाद साधू शकतो. पण केवळ विद्याविहार स्थानकातच चांगला वेग मिळत असल्याचेही त्याने सांगितले.

पालिका मुख्यालय परिसर

या परिसरातील हॉटस्पॉटला १.०४ एमबीपीएसपर्यंत वेग मिळत होता. तसेच या वेगात सातत्य असल्यामुळे इंटरनेटचा वापर जलदगतीने करत येता होता. मात्र या परिसरातील खाऊ गल्लीत पोटपुजा करणाऱ्या लोकांना या वायफायची फारशी माहिती नव्हती. येथील फेरिवाले मात्र या वायफायचा पुरेपूर फायदा घेत होते.

एअर इंडिया परिसर

एअर इंडिया परिसरातील वायफाय जोडणीही झाली नाही. यामुळे सरकारने दावा केलेल्या सर्वच ठिकाणी वायफाय मिळतेच असे नाही. ज्या ठिकाणांवर मिळते त्यातील बहुतांश ठिकाणी वेग मंदावलेला असतो. यामुळे वायफाय देऊन मुंबईकरांना खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सामान्य मुंबईकर यावर फारसे संतुष्ट दिसत नाहीत.

मुंबई उच्च न्यायालय

या परिसरात वायफायचा वेग मध्येच ० एमबीपीएस तर मध्येच ०.४१ एमबीपीएसपर्यंत जात होता. पण वेगात सातत्य नसल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप संवाद होणेही अवघड होत होते. परिसरात वकिलांच्या गाडय़ा पार्क करून तेथे विसावा करणारे चालक या वायफायचा वापर करत होते. मात्र आठ दिवसांपासून वेगात चढउतार आहे.