सरासरी मूल्यांकनानुसार नववीत अनुत्तीर्ण झालेल्या राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होण्याची चिन्हे नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या प्रवेशाबाबत यंदा संड्टा्रम निर्माण झाला आहे. एकिकडे दहावीच्या वर्गासाठी अध्यापन सुरू झालेले असताना या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेची संधी नाकारून दहावीच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे नववीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वर्षभरातील आधी झालेल्या परीक्षांमधील गुणांच्या सरासरीनुसार करण्यात आले. शाळेचा दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी विद्यार्थ्यांना नववीतच अनुत्तीर्ण करून दहावीची परीक्षा बाहेरून देण्यास शाळा भाग पाडत असल्याच्या तक्रारी गेली काही वर्षे पालक करत आहेत. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी नववीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश शासनाने दिले. यंदा सरासरी मूल्यांकनानुसार देण्यात आलेल्या गुणांवरही पालक आणि विद्यार्थी नाराज आहेत. शाळांनी जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण केल्याचा आक्षेपही पालक घेत आहेत. मात्र, यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होण्याची चिन्हे कमी आहेत. दहावीच्या वर्गासाठी अध्यापन सुरू झाले आहे. मुळातच वर्ष उशीरा सुरू झाले आहे. नववीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधीही न देता दहावीच्या वर्गात शाळा प्रवेश नाकारत आहेत.

अपंग विद्यार्थ्यांसमोर अडचणी

अपंग, अध्ययन अक्षम किंवा काही विषयांमध्ये, लिखाणात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात बसू न देण्याकडे शाळांचा कल असतो. लेखी परीक्षेच्या सरासरीनुसार करण्यात आलेल्या मूल्यांकनामुळे या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांनाही फेरपरीक्षेची संधी न मिळाल्यामुळे त्यांना पुढील वर्गातील शिक्षणाची संधीच नाकारली जात आहे. त्याचप्रमाणे वर्षांतील दोन चाचणी आणि सहामाही परीक्षा, तोंडी परीक्षा शाळा घेतात. या कालावधीत एखाद्या परीक्षेसाठी कौटुंबिक अडचणी किंवा आजारपण यांमुळे विद्यार्थी उपस्थित राहू शकत नाहीत. मात्र, सरासरी मूल्यांकनात अनुपस्थित राहिलेल्या विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी मिळावी किंवा त्यांना सरसकट उत्तीर्ण करून शाळांनी दहावीच्या वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी पालक करत आहेत.

सीबीएसईच्या फेरपरीक्षा होणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी आणि अकरावीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांंच्या सुरक्षेची काळजी घेऊन, आवश्यक निकष पाळून परीक्षा घेण्याची सूचना मंडळाने दिली आहे. परीक्षा रद्द करण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या सूचना नाहीत. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेची संधी द्यावी. या परीक्षा लेखी, ऑनलाइन किंवा प्रकल्पांच्या स्वरूपातही घेता येतील, असे मंडळाने सांगितले आहे.

‘शाळा, पालक आणि शिक्षण विभाग तिघांनीही याबाबत सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. शाळांनी दहावीचा निकाल घसरेल असा विचार करून विद्यार्थ्यांना संधी नाकारू नये. त्याचप्रमाणे एखादा विद्यार्थी अनेक विषयांत अनुत्तीर्ण झाला असेल, कच्चा असेल तर त्याच्याबाबत पालकांनीही दहावीला प्रवेश देण्याचा हट्ट धरणे योग्य नाही. ते विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. नियमानुसार फेरपरीक्षा घेणे आवश्यक आहे. मात्र सद्यस्थितीत फेरपरीक्षेबाबत काय करावे याबाबत शिक्षण विड्टाागाने धोरण स्पष्ट करावे.’

– प्रशांत रेडीज, मुख्याध्यापक संघटना

सध्या फेरपरीक्षा घेणे शक्य नाही अशावेळी नववी आणि अकरावीला अनुत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा. त्यांची पुढील संधी नाकारणे अन्याय्य आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना जो न्याय लावला तो नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही लावावा.

–   शिवनाथ दराडे, कार्यवाह, शिक्षक परिषद