वरळी येथील ‘कॅम्पा कोला’च्या रहिवाशांना दिलेली मुदत येत्या २ ऑक्टोबर रोजी संपत असून गुरुवारी रहिवाशांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आपण त्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने रहिवाशांना दिलासा देण्यास नकार दिला.
‘कॅम्पा कोला’मधील सात इमारतींचे पाचच्या वरचे सगळे मजले अनधिकृत असल्याचे सांगत ते जमीनदोस्त करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. २ ऑक्टोबर रोजी रहिवाशांना दिलेली मुदत संपत असल्याने गुरुवारी रहिवाशांनी न्यायालयाचे दार ठोठावून दिलासा देण्याची विनंती केली. परंतु न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करू शकत नसल्याचे स्पष्ट करीत रहिवाशांना दिलासा देण्यास नकार दिला.