मुंबई : हिजाब परिधान करत असल्यामुळे आधी वर्गात प्रवेश न दिल्याचा आणि आता कमी उपस्थितीच्या नावाखाली परीक्षेस बसू न दिल्याचा आरोप करणाऱ्या भिवंडी येथील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शुक्रवारी नकार दिला.

कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थिनीला वैद्यकीयच्या परीक्षेस बसू दिले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने तिची जूनमध्ये होणाऱ्या पहिल्या पुनर्परीक्षेला बसू देण्याची मागणी फेटाळून लावली. त्याच वेळी हिजाबच्या कारणास्तव तिची अडवणूक न करता डिसेंबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या पुनर्परीक्षेस तिला बसू देण्याचे आदेश संबंधित महाविद्यालयाला, तर तिनेही वर्गात उपस्थिती लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

फाकेहा बदामी ही भिवंडी येथील साई होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिकते. आपण हिजाब परिधान करत असल्यामुळे महाविद्यालयाने आपल्याला वर्गात प्रवेश दिला नाही. त्यामुळे वर्गातील उपस्थिती कमी आहे. याच कारणास्तव महाविद्यालय पुनर्परीक्षेला बसू देत नाही, असा आरोप तिने केला होता.