एप्रिलमध्ये मानधन देण्याचा सरकारचा वायदा

पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यसाठी नेमण्यात आलेल्या सागरी सुरक्षा रक्षकांना पोहता येत नाही की अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात आले नसून  मानधनावर काम करणाऱ्या या सुरक्षा रक्षकांना सहा महिन्यांपासून मानधनही देण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यानंतर एप्रिल महिन्यात ही थकित मानधनाची रक्कम दिली जाईल असे आश्वासन मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी आज विधान परिषदेत दिले.

मुंबईवरील अतिरेक्यांचा हल्ला आणि सागरी मार्गाने त्यांचे झालेले आगमन लक्षात घेऊन सागरी सुरक्षेसाठी मस्त्य विभागाने एकूण २७३ सुरक्षा रक्षक व २३ पर्यवेक्षक नेमले. हे सर्व सुरक्षा रक्षक मानधनावर नेमण्यात आले असून त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प असल्याचा आक्षेप आमदार जयंत पाटील यांनी घेतला. तसेच या रक्षकांना पोहोता येत नाही की त्यांना अतिरेक्यांचा सामना करण्यासाठीचे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले. मुंबईच्या सागरी परीक्षेत्रात एकूण ९१ जागा या संवेदनशील असून अजूनही आपण सागरी सुरक्षेसाठी योग्य ती काळजी घेत नसल्याचा आक्षेप सुनील तटकरे यांनी घेतला.

उत्तरादाखल या सुरक्षा रक्षकांना एका आठवडय़ाचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगून अधिक प्रशिक्षण दिले जाईल असे मंत्र्यांनी सांगितले. तसेच एप्रिल महिन्यात त्यांचे थकित मानधन देण्यात येईल असेही आश्वासन महादेव जानकर यांनी दिले.