न्यायालयाच्या आदेशानंतरही पाìकग जोरात; विविध आस्थापनांमुळेही उड्डाणपुलांना धोका

भाईंदर, ठाणे आणि वाशी येथील खाडय़ांवरील रेल्वेचे पूल दहशतवादी हल्ल्यात उडवून देण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली असताना मुंबईतील रस्त्यांवरील उड्डाणपुलांच्या सुरक्षेचीही ऐशीतशी झाली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने उड्डाणपुलांखाली पाìकग करण्यास मनाई केली असताना आजही मुंबईतील जवळपास सर्वच उड्डाणपुलांखाली गाडय़ा बिनधास्त उभ्या केलेल्या दिसतात, तर दुसऱ्या बाजूला वाहतूक पोलिसांच्या चौक्या, महापालिकेच्या काही विभागांची छोटी कार्यालये, भांडार आणि प्रसाधनगृहे यांच्यामुळेही उड्डाणपुलांखालील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार यांना मुंबईशी जोडणारे रेल्वेचे तीन पूल दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने दिला होता. त्या पाश्र्वभूमीवर मुंबईच्या रस्त्यांवर असलेल्या उड्डाणपुलांखाली एक नजर टाकली असता या पुलांच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता, जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता या सर्वच रस्त्यांवर असलेल्या जवळपास सर्वच उड्डाणपुलांखाली एक तर सर्रास पाìकग झालेले दिसते किंवा कोणत्या ना कोणत्या सरकारी विभागाचे काही तरी आस्थापन असलेले दिसते.

पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर, लालबाग, खोदादाद सर्कल या पुलांखाली प्रामुख्याने वाहतूक पोलिसांच्या चौक्या आहेत. त्याशिवाय पश्चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रूझ, कलानगर उड्डाणपूल, अंधेरी येथे या चौक्या दिसतात. वाहतूक पोलिसांनी केवळ चौक्या उभारल्या असत्या, तरी सुरक्षेचा प्रश्न फार नव्हता; पण बाजूला ‘नो पाìकग’ क्षेत्रात उभी केलेली वाहने उचलून या चौक्यांच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत आणून ठेवली जातात. त्या वाहनांच्या सामान ठेवायच्या जागेत मोठा स्फोट घडवण्यासाठीची स्फोटके ठेवून उड्डाणपूल उडवला जाऊ शकतो.

त्याशिवाय पश्चिम द्रुतगती महामार्गावर जवळपास प्रत्येक उड्डाणपुलाखाली सर्रास गाडय़ा उभ्या असलेल्या दिसतात. या गाडय़ांमध्ये मोठय़ा ट्रक व बसपासून खासगी गाडय़ा आणि रिक्षांपासून अप बेस्ड कॅबपर्यंत अनेक गाडय़ांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उड्डाणपुलांखाली उभ्या असलेल्या दुचाकींची संख्याही प्रचंड आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर हा प्रकार कुर्ला, अमर महल, घाटकोपर येथील उड्डाणपुलांखाली पाहायला मिळतो. कुर्ला येथील उड्डाणपुलाखाली तर ब्रास बँडच्या गाडय़ाही उभ्या दिसतात.

मुंबईत शौचालयांचा प्रश्न खूप महत्त्वाचा मानला जातो. तो सोडवण्यासाठी महापालिकेने अनेक उड्डाणपुलांखाली स्वच्छतागृहे वा शौचालये बांधली आहेत. सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावर लाल बहादूर शास्त्री मार्ग ओलांडताना लागणाऱ्या उड्डाणपुलाखाली यातील दोन शौचालये आहेत. त्याशिवाय दादरच्या खोदादाद सर्कलजवळील उड्डाणपूल, दादर स्थानकाबाहेरील केशवसुत उड्डाणपूल यांच्या खालीही स्वच्छतागृहे दिसतात. या स्वच्छतागृहांमध्ये एखादी बॅग घेऊन गेलेल्या माणसाकडे परत येताना ती बॅग नसेल, तर ते पाहण्यासाठीही येथे कोणीच किंवा कोणाचे लक्षही नसते. अशा बॅगेत स्फोटके भरून ती शौचालयांमध्ये ठेवून अख्खा उड्डाणपूल उडवला जाण्याची शक्यता आहे.

पालिका, सरकारकडूनही बांधकाम

विशेष म्हणजे उड्डाणपुलांखालच्या या आस्थापनांमध्ये महापालिकेचीही काही आस्थापने आहेत. दादर येथे राज्य सरकारच्या परिवहन महामंडळाचे कार्यालय, प्रतीक्षालय, शौचालय अशा अनेक गोष्टी आहेत. भायखळा येथील खडा पारशी उड्डाणपुलाखाली महापालिकेचे भांडार आणि पाटय़ा रंगवण्याच्या विभागाचे कार्यालय आहे. उच्च न्यायालयाने उड्डाणपुलांची सुरक्षा लक्षात घेऊनच उड्डाणपुलांखाली पाìकग करण्यास मनाई केली होती. मग सुरक्षेच्या दृष्टीने इतर आस्थापनांची कार्यालयेही धोकादायक ठरत असताना त्याचे काय करायचे, हा प्रश्न आहे.