विधान परिषद निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. राष्ट्रवादीला हव्या असलेल्या जागा देण्यास काँग्रेसने विरोध दर्शविला असून, पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीचा आढावा घेण्याकरिता काँग्रेस नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. पक्षाचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. नगर, सोलापूर, बुलढाणा-अकोला या जागा राष्ट्रवादीकडे असल्या तरी यापैकी एका जागेवर काँग्रेसचा डोळा आहे. नगर आणि सोलापूरपैकी एक जागा मिळावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असला तरी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने ही जागा मिळाली पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांशी पुन्हा एकदा चर्चा करण्यात येणार आहे. त्यात तोडगा निघेल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. नगर आणि सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तसेच बुलढाण्याची जागा गेल्या वेळी थोडय़ा मतांनी गमवावी लागली होती. या तिन्ही जागांवर समझोता होऊच शकत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली.