‘सिंटा, एफडब्ल्यूआयसीई’सारख्या संघटनांचा इशारा

मुंबई : मुंबईसह इतर परिसरातील हिंदी-मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू होण्याआधीच पुन्हा एकदा बंद पडले आहे.  सोमवारी ‘फे डरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ आणि ‘सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत जोवर कलाकार आणि तंत्रज्ञांचे मानधन, त्यांच्या कामाच्या वेळा आणि त्यांच्या सुरक्षेबद्दलच्या उपाययोजना याबद्दल लेखी आश्वासन निर्मात्यांकडून दिले जात नाही तोवर मालिकांचे चित्रीकरण सुरू होऊ देणार नाही, असा निर्णय संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी घेतला.

त्यामुळे मंगळवारपासून ज्या मालिकांचे चित्रीकरण सुरू होणार होते ते पुन्हा काही काळ रखडणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टाळेबंदीच्या काळात कलाकारांचे उर्वरित मानधन आधी दिले जावे, अशा सूचना निर्माते आणि ब्रॉडकास्टर्स यांना दिल्या होत्या. मात्र अद्याप काहीजणांनी त्याची पूर्तता के लेली नाही. याउलट, काही निर्मात्यांनी मानधनात कपात के ली असून चित्रीकरणासाठी सेटवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कलाकार-तंत्रज्ञांना विश्वासात न घेता निर्मात्यांनी घेतलेला चित्रीकरणाचा निर्णय योग्य नाही. त्यामुळे चित्रीकरण सुरू होण्याआधीच आम्ही आमच्या मागण्या निर्मात्यांसमोर ठेवल्या आहेत, अशी माहिती एफडब्ल्यूआयसीईचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी दिली.

संघटनांच्या मागण्या

* कलाकार-तंत्रज्ञांचे उर्वरित मानधन ताबडतोब दिले जावे.

* आठ तासांचा कार्यकालावधी सगळ्यांसाठी निश्चित के ला जावा. इतरवेळी निर्मात्यांच्या गरजेनुसार अनेकदा कलाकार स्वेच्छेने सहकार्य करतात, मात्र कामाची वेळ निश्चित असावी.

* रोजंदारीवर काम करणाऱ्यांना दिवस संपतानाच त्यांचे मानधन दिले जावे.

* महिन्याचा करार असणाऱ्यांना दर महिन्याला मानधन दिले जावे.

काही निर्मात्यांना परवानगी देणार

निर्मात्यांच्या संघटनांबरोबर सातत्याने चर्चा सुरू आहे, मात्र त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळालेले नाही. काही निर्मात्यांनी वैयक्तिकरीत्या काम थांबू नये म्हणून या अटींची पूर्तता करण्याची तयारी दाखवली आहे. खरे तर, निर्मात्यांनी एकत्रित भूमिका घेणे अपेक्षित आहे. पण निदान ज्या निर्मात्यांनी या अटी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे, त्यांना चित्रीकरणाची परवानगी देण्याचा विचार सुरू आहे.