भाजपाने मंदिरं उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर जे आंदोलन झालं त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहण्यास मिळाला. बार उघडले गेले आहेत, रेस्तराँ उघडले गेले आहेत मग मंदिरं आणि मशिदी बंद का? धर्मस्थळं बंद का? असा प्रश्न भाजपाच्या आंदोलकांनी विचारला. करोना आणि लॉकडाउनमुळे मंदिरं, मशिदी, चर्च सगळं बंद आहे. अनलॉकमध्ये काही गोष्टी सुरु होत आहेत. अशात मंदिर प्रवेशालाही परवानगी द्यावी अशी मागणी करत भाजपाने आंदोलन केलं. या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण फज्जा उडालेला पाहण्यास मिळाला.

भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हातात गणपती बाप्पाची मूर्ती आणली होती. या मूर्तीची आरती करण्यात आली आणि भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. काही वेळासाठी वातावरण तणावाचंही झालं होतं. दरम्यान बार आणि रेस्तराँ सुरु करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरं बंद ठेवताना लाज वाटत नाही का? असाही प्रश्न या आंदोलकांनी विचारला. फक्त मुंबईतच नाही तर राज्यभरातली मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्यात येतं आहे. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजपा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात काहीशी झटापटही झाली. या संपूर्ण आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाल्याचं पाहण्यास मिळालं.

“मुख्यमंत्री एका वेळी दोन वक्तव्यं करतात. आधी सांगायचं तुम्ही खबरादारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो. आता माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत जनतेवर जबाबदारी का टाकत आहात? तुम्ही सक्षम नाही म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणता. तुमची घोषणा माझं सरकार माझी जबाबदारी का नाही?” असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला.