रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुंबईच्या रूळांवरून वातानुकुलित लोकल धावणार असली, तरी या लोकलचे तिकीट सर्वसामान्यांना घाम फोडणारे असेल.चर्चगेट ते बोरिवली या मार्गावर धावणार असणाऱ्या या वातानुकुलित गाडीचे र्टिन तिकीट ४०० रुपयांच्या आसपास असल्याचे सूत्रांकडून समजते. श्रीमंतांना परवडणाऱ्या या गाडीचा मासिक पासही मिळणार नाही, असे समजते.
येत्या जुलै महिन्यापासून पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-बोरिवली या दरम्यान वातानुकुलित गाडीचा प्रवास सुरू होईल, असे रेल्वे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या रेल्वेचे वेळापत्रक व तिकीट याबाबत पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून रेल्वे बोर्डाचे सदस्य देविप्रसाद पांडे यांनी गेल्या आठवडय़ात पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चगेट-बोरिवली या ३३ किलोमीटरच्या अंतरासाठी सध्या प्रथम वर्गाचे तिकीट १२० रुपये आहे. हा दर विचारात घेता वातानुकुलित गाडीचे चर्चगेट-बोरिवली या एकेरी मार्गाचे तिकीट १९६ रुपये ठेवण्याबाबत एकवाक्यता आहे. दरम्यान, या गाडीचा मासिक पास उपलब्ध होणार नाही. मात्र त्याऐवजी साप्ताहिक किंवा १५ दिवसांचे तिकीट देण्याबाबत विचार सुरू आहे. तसेच या तिकिटासाठी रांगेत उभे न राहता, ई-तिकीटचा पर्याय देण्याचा प्रयत्नही सुरू आहे. मात्र सध्या तिकिटांच्या दरांची चर्चा ऐकूनच घाम फुटलेले मुंबईकर जुलै महिन्यात ‘गडय़ा, आपुली नेहमीचीच गाडी बरी’, असेच म्हणण्याची शक्यता जास्त आहे.