स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली लिलावाचा दुसरा प्रयत्न अपयशी
किंगफिशर एअरलाइन्सच्या ब्रँड व व्यापारचिन्हांचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला असता, त्यासाठी कुणीच बोली लावली नाही, त्यामुळे थकीत कर्ज परत करण्यासाठी लिलावातून पैसे मिळवण्याचा सतरा बँकांचा प्रयत्न फसला आहे. एकूण ३६६.७० कोटी रुपये लिलावातून मिळतील असे वाटत होते, पण ती आशा फोल ठरली आहे. उद्योगपती विजय मल्या यांच्या मालकीची किंगफिशर कंपनी यापूर्वीच बुडाली आहे.
सतरा बँकांच्या महासंघाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली केलेला हा लिलावाचा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी किंगफिशर हाऊसचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला असता तेव्हाही कुणी बोली लावली नाही. किंगफिशर ही हवाई वाहतूक कंपनी यापूर्वीच बंद पडली असून, बँकांकडून विजय मल्या यांनी मोठे कर्ज घेतले असल्याने त्यातील काही पैसे लिलावाच्या माध्यमातून वसूल करण्याचे प्रयत्न होत आहेत.
आजच्या लिलावात किंगफिशरचा लोगो, फ्लाय द गुड टाइम्स ही टॅगलाइन तसेच फ्लाइंग मॉडेल्स, फनलायनर, फ्लाय किंगफिशर व फ्लाइंग बर्ड डिव्हाइस यांचा समावेश होता. एकूण ३६६.७० कोटी रुपये यातून मिळणे अपेक्षित होते. कर्ज घेताना या बाबी हमी म्हणून दाखवण्यात आल्या होत्या. ही आरक्षित किंमत कुणाही बोली लावणाऱ्या व्यक्तीसाठी जास्तच होती. त्यामुळे कुणी बोलीच लावली नाही. सकाळी साडेअकरा वाजता लिलाव सुरू झाला, पण तासभर उलटूनही कुणी बोली लावली नाही. एसबीआयकॅप ट्रस्ट कंपनीने हा लिलाव आयोजित केला होता. किंगफिशर ब्रँडची किंमत ऐन भराच्या काळात ४००० कोटी होती असे ग्रँट थॉर्नटन या मूल्यनिर्धारक कंपनीने सांगितले होते. २०१२-१३च्या कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार किंगफिशर ही देशातील पंचतारांकित वाहतूक कंपनी होती व ते मानांकन स्कायट्रॅक्सने दिले होते. किंगफिशर मद्य व किंगफिशर एअरलाइन्स हे दोन वेगळे ब्रँड होते.