महापालिका अर्थसंकल्पात पायाभूत सोयी, माहिती तंत्रज्ञानासाठी भक्कम तरतूद
मुंबईकरांवर कोणतीही करवाढ न करता उलट चार कोटी ६६ लाख रुपये शिल्लक दाखविणारा मुंबई महापालिकेचा ३७,०५२ कोटी १५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला.
पुढील वर्षी होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन अर्थसंकल्पावर आपली छाप असावी यासाठी शिवसेना आणि भाजप आग्रही होते. तरी पालिका आयुक्त अजय मेहता यांनी प्रशासनाचीच छाप असलेला हा अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीत सादर केला.
डांबरी व सिमेंटचे रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा, घनकचरा प्रक्रिया तसेच माहिती-तंत्रज्ञानासाठी अर्थसंकल्पात भरभक्कम तरतूद आहे. सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात आहे. तळोजा, देवनार, मुलुंड आदी कचराभूमीवरील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यालाही प्राधान्य आहे.