मंडळाच्या परीक्षेसाठी आवश्यक इंडेक्स क्रमांकही नसल्याचे उघड

केजी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या मुंबई पब्लिक स्कूलपैकी १६ शाळांमध्ये यंदा दहावीचे वर्ग सुरू झाले. शाळा सुरू होऊन दीड महिना संपला तरी या शाळांमध्ये शिक्षकच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या शाळांमध्ये काही शिक्षक देण्यात आले असून, आणखी ४२ शिक्षकांची गरज आहे. इतकेच नव्हे तर शाळांतील मुलांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची परीक्षा देताना नोंदणीसाठी आवश्यक असलेला इंडेक्स क्रमांकही शाळेला नसल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

तळागाळातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबई पब्लिक स्कूल नावाने काही इंग्रजी शाळा सुरू केल्या. सुरुवातीला पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या या शाळांमध्ये केजी ते दहावीपर्यंतचे वर्ग करा, अशी मागणी जोर धरू लागली. यानुसार पालिकेने दरवर्षी एक अशी इयत्ता वाढवत नेली. या वर्षी १६ ठिकाणी दहावीचे वर्ग सुरू झाले. तर इयत्ता नववीचे २० ठिकाणी वर्ग सुरू झालेत. पण या सर्व वर्गावर इंग्रजी माध्यमाचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या वर्गामध्ये शिकण्यासाठी शालेय शिक्षण तसेच बीएडचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेल्या शिक्षकांची आवश्यकता असते. पण या शाळांमध्ये मराठी, हिंदी, उर्दू माध्यमातील शिक्षक दिले असून तेही पुरेसे नसल्याची बाब शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली.

याचबरोबर या शाळांना मंडळाचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेला इंडेक्स क्रमांकही नसल्याची बाब दराडे यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, प्रशासनाने वर्ग सुरू करण्यापूर्वीच या सर्व गोष्टींची तरतूद करून ठेवणे अपेक्षित होते असेही दराडे यांनी म्हटले आहे. इयत्ता दहावीचे अतिरिक्त वर्ग घेण्यासाठी अनेक शाळा जून महिन्याच्या पूर्वीच सुरू झाल्या असताना पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप शिक्षक न मिळणे ही खूपच दुर्दैवी बाब असल्याचेही ते म्हणाले.

ल्ल या वर्षी १६ ठिकाणी दहावीचे वर्ग सुरू झाले. तर इयत्ता नववीचे २० ठिकाणी वर्ग सुरू झाले आहेत. पण या सर्व वर्गावर इंग्रजी माध्यमाचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

सेवाभावी संस्थांकडून शिक्षक

दहावीच्या वर्गासाठी आत्तापर्यंत ५२ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, आणखी ४२ शिक्षकांची गरज असल्याची बाब प्रशासनाला माहिती आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे पालिकेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी गोविंद कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. गणित आणि विज्ञान शिकविण्यासाठी बीएस्सी बीएड शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित शिक्षकही लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. भाषा विषयाच्या शिक्षकांसाठी पालिकेने काही सामाजिक संस्थांशी चर्चा केली असून, त्यांच्या माध्यमातून तज्ज्ञ भाषा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.