छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

मुंबईतील अरबी समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाचे दोन वर्षापूर्वी मोदींनी जलपूजन केले होते. परंतु पुढे त्याचे काही झालेले नाही. परंतु आता निवडणूका डोळयासमोर आल्यावर कार्यकर्तृत्व दाखवण्यासाठी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबतही तीच परिस्थिती आहे. सरकार काही करत नाही नुसता प्रचारावर त्यांचा भर आहे, अशी जोरदार टीकाही मलिक यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी जाहीर करण्यात आली. या कर्जमाफीचा किती फायदा झाला. ३८ हजार कोटींची कर्जमाफी, १६ हजार कोटींचे वाटप अजून झालेले नाही. दुष्काळ अजून जाहीर होत नाही. जलयुक्तशिवार योजनेचा प्रचार करत आहेत, त्याचा फायदा मिळत नाही. एकंदरीत साडेचार वर्ष केंद्राचा आणि चार वर्ष राज्याचा कारभार पाहिला तर लोकांच्या जीवनात काही बदल झालेला नाही. उलट बेरोजगारी, महागाई वाढत चालली आहे आणि आता लोकांच्या डोळयात धुळफेक करण्याचे काम सरकारने सुरु केल्याचेही नवाब मलिक म्हणाले.