अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘एआयबी नॉकआऊट’ या कार्यक्रमाप्रकरणी पुणे आणि मुंबई येथे दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने त्याच्या याचिकेवरील सुनावणी १६ मार्च रोजी ठेवली असून तोपर्यंत त्याला अटक करू नये, असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत गिरगाव न्यायालयाने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर ताडदेव पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक आणि यात सहभागी झालेला निर्माता करण जोहर, अभिनेता अर्जुन कपूर, रणवीर सिंग, अभिनेत्री दीपिका पादुकोण, आलिया भट यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.