आणखी आरोग्य यंत्रणा उभ्या राहत असल्याचे मुंबई पालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : करोना रुग्णांची वाढत जाणारी संख्या, रुग्णांना खाटा न मिळणे, नाइलाजाने घरीच उपचार घेण्यास भाग पडणे यानंतरही मुंबईत रेल्वेच्या डब्यांचा करोना रुग्णांसाठी वापर झालेला नाही. मुंबईत करोना रुग्णांसाठी आणखी आरोग्य यंत्रणा उभ्या राहात असल्याने विलगीकरण डब्यांचा तूर्तास वापर करणार नसल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गेल्या वर्षीपासूनच रेल्वेने एक्स्प्रेसच्या डब्यांमध्येच सुसज्ज असे विलगीकरण कक्ष तयार के ले. मात्र गेल्या वर्षभरापासून ते आतापर्यंत या विलगीकरण डब्यांचा वापरच झाला नाही. त्यामुळे विलगीकरण कक्षांचे पुन्हा एक्स्प्रेस डब्यांमध्ये रूपांतर करण्याची वेळ मध्य रेल्वेवर आली. मध्य रेल्वेने ४८२ पैकी ४८ डबेच विलगीकरणाचे तयार ठेवले असून ते मुंबईबाहेर उपलब्ध करून दिले आहेत. पश्चिम रेल्वेने ३८६ पैकी १२८ डबे मुंबई विभागासाठी सज्ज ठेवले आहेत. परंतु त्यांचा वापर करण्याबाबत राज्य सरकार व स्थानिक पालिकांचा विचार झालेला नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नंदुरबार रेल्वे स्थानकात १८ एप्रिल २०२१ पासून २१ विलगीकरण डब्यांची गाडी तयार ठेवण्यात आली आहे. सध्या ९७ करोना रुग्ण उपचार घेत होते. यात ६६ रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले, तर ३१ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. ५ मे २०२१ पासून २१ विलगीकरण डबे पालघर रेल्वे स्थानकातही उभे करण्यात आले आहेत. नागपूर रेल्वे स्थानकातही ११ विलगीकरण डबे तयार ठेवले असून यात दोन रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती रेल्वेने दिली.

मुंबईत मात्र रेल्वे विलगीकरण डब्यांचा विचार अद्यापही झालेला नाही. सध्या करोना रुग्णांसाठी मुंबईत खाटा उपलब्ध असल्याने रेल्वेचे डबे वापरण्याबाबत विचार करण्यात आलेला नाही, असे मुंबई पालिकेचे अतिरिक्त  आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. गेल्या वर्षी परिस्थिती पाहता रेल्वेच्या विलगीकरण डब्यांचा विचार झाला होता.

सध्या अतिदक्षता विभागाची (आयसीयू) गरज अधिक आहे. रेल्वे विलगीकरणाच्या डब्यात अतिदक्षता विभाग होऊ शकत नाही. तेथे प्राणवायू सिलिंडर व अन्य सुविधा उपलब्ध असल्या तरी अतिदक्षता विभाग हा रुग्णालयातच असणे योग्य ठरते. सध्या मुंबईत १२ हजारपैकी ४ हजार खाटा रिक्त आहेत. याशिवाय मुंबईत पालिकेकडून चार जम्बो कोविड केंद्रेही उभे राहाणार आहेत. त्यामुळे पालिकेकडून उभारल्या जाणाऱ्या सुविधा पाहता रेल्वे विलगीकरण डब्यांचा विचार तूर्तास तरी नसल्याचे काकाणी म्हणाले.

एका डब्यात १६ खाटा

रेल्वेच्या एका डब्यात १६ खाटा आणि वैद्यकीय उपकरणे, रक्तपुरवठा, प्राणवायूची सुविधा, व्हेंटिलेटर, प्रसाधनगृहाची व्यवस्था, तसेच डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.