मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जाहीरनाम्यातीलच मुद्दे मांडले असून, त्यामुळे आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग झालेला नाही, असे स्पष्टीकरण भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.

निवडणुकीत प्रत्येक पक्षाला आपला जाहीरनामा सांगण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर मतदारसंघातील प्रचारात भाजपच्या जाहीरनाम्यातीलच काही मुद्दे मांडले. या मुद्यांचे सूतोवाच त्यांनी निवडणुकीपूर्वीही केले आहे. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची काँग्रेस उमेदवाराच्या प्रतिनिधीची तक्रार पूर्णपणे चुकीची असल्याचे केशव उपाध्ये यांनी सांगितले.

पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक प्रचारात जनतेचा प्रतिसाद मिळत असून त्यामुळे भाजपचाच उमेदवार विजयी होईल हे स्पष्ट असून मुख्यमंत्र्यांच्या सभेत याची खात्री पटली. त्यामुळे

निराश झालेले विरोधक निर्थक मुद्दे काढून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मतदार कोणत्याही प्रकारे विचलित होणार नाहीत आणि विकासाच्या मुद्यावर भाजपलाच पाठिंबा देतील असेही उपाध्ये म्हणाले.